वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिग्गज भारतीय टेनिसपटू रोहन बोपण्णाने सात वर्षांनंतर एटीपी दुहेरीच्या क्रमवारीत पुन्हा प्रगती केली आहे. सध्या हा 43 वर्षीय भारतीय खेळाडू जागतिक क्रमवारीत 9 व्या स्थानावर आहे, जून 2016 नंतर अव्वल दहामध्ये त्याला स्थान मिळण्याची ही पहिलीच खेप आहे.
गेल्या वर्षी गुडघ्याच्या दुखापतीमुळे डेव्हिस चषक आणि इतर काही स्पर्धांमधून माघार घ्यावी लागलेल्या बोपण्णाला मोसमाच्या सुऊवातीला 19 व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट रँकिंग तिसरे आहे, जे त्याने 2016 मध्ये गाठले होते. या मोसमात त्याने आतापर्यंत 13 स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. मार्चमध्ये इंडियन वेल्स मास्टर्समध्ये बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एबडेन यांनी विजेतेपद मिळवून त्यासरशी बोपणा हा एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धा जिंकणारा सर्वांत वयस्कर खेळाडू ठरला होता. बोपण्णा आणि एबडेन यांनी फेब्रुवारीमध्ये कतार ओपन जिंकली तसेच मेमध्ये माद्रिद ओपनची अंतिम फेरी गाठली.









