18 ऑक्टोबरला कार्यकारिणी बैठकीत अधिकृत घोषणा शक्य, जय शाह यांना सचिवपदी मुदतवाढीचे संकेत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताचे 1983 विश्वचषक विजयातील एक शिल्पकार रॉजर बिन्नी बीसीसीआयचे पुढील अध्यक्ष असतील, असे स्पष्ट संकेत आहेत. दि. 18 ऑक्टोबर रोजी बीसीसीआयची वार्षिक कार्यकारिणी बैठक होत असून त्यात या निवडीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. निवडीची औपचारिकता पार पडल्यानंतर रॉजर बिन्नी मावळते अध्यक्ष व माजी कर्णधार सौरभ गांगुली यांच्याकडून कार्यभार स्वीकारतील. विद्यमान सचिव जय शाह यांना आणखी एक टर्म मुदतवाढ मिळेल, असे सध्याचे संकेत आहेत.
माजी मध्यमगती गोलंदाज रॉजर बिन्नी भारताच्या वर्ल्डकप विजयाचे शिल्पकार राहिले असून वर्ल्डकपमधील 8 सामन्यात त्यांनी 18 बळी घेतले. ही त्या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी ठरली.

मागील आठवडय़ातील प्रदीर्घ चर्चासत्रानंतर बेंगळूरचे 67 वर्षीय रॉजर बिन्नी बीसीसीआयचे 36 वे अध्यक्ष असतील, असे ठरवले गेले असल्याची माहिती सूत्राने दिली. सचिवपदी मुदतवाढ मिळणे स्पष्ट असणारे जय शाह आता पॉवरफुल आयसीसी बोर्डात भारताचे प्रतिनिधी म्हणून काम पाहतील, असेही संकेत आहेत.
मुंबईत बीसीसीआय कार्यकारिणी बैठकीत सर्व निवडी बिनविरोध होण्याची शक्यता असून यामुळे मतदान घेण्याची आवश्यकता भासणार नाही. रॉजर बिन्नी, जय शाह यांच्यासह सर्व इच्छुकांनी आपापल्या पदाकरिता मंगळवारी अर्ज दाखल केले.
कार्यकारिणीतील एकमेव काँग्रेसी राजीव शुक्ला उपाध्यक्षपदी कायम राहतील तर क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांचे कनिष्ठ बंधू अरुण सिंग धुमल आयपीएल चेअरमनपदी विराजमान होतील. विद्यमान कार्यकारिणीत अरुण सिंग धुमल खजिनदार होते तर आयपीएल कार्यकारिणी अध्यक्षपद ब्रिजेश पटेल यांच्याकडे होते.
महाराष्ट्राचे भाजप नेते आशिष शेलार नवे खजिनदार असतील. यामुळे ते मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी कायम राहणार नाहीत, हे स्पष्ट झाले. आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा शर्माचे निकटवर्तिय देवजीत सायकिया हे नवे संयुक्त सचिव म्हणून जयेश जॉर्ज यांच्याकडून सूत्रे स्वीकारतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आयसीसी अध्यक्षपदासाठी रिंगणात उतरणार का, हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.
दुसऱया टर्मसाठी गांगुली इच्छुक होते. पण…
सोमवारी सायंकाळी मुंबईत पोहोचलेले सौरभ गांगुली बीसीसीआय अध्यक्ष या नात्याने दुसरी टर्म मिळावी, यासाठी इच्छुक होते. पण, बीसीसीआय अध्यक्ष या नात्याने दुसरी टर्म देण्याची रीत नाही, असे त्यांना मंडळाच्या वतीने कळवण्यात आले. सौरभ गांगुली यांना यावेळी मंडळाने आयपीएल अध्यक्षपदाचा प्रस्ताव दिला. पण, तो त्यांनी फेटाळून लावला. बीसीसीआय अध्यक्षपद हाताळल्यानंतर त्यापुढे बीसीसीआयमधील कोणत्याही उपगटाचे नेतृत्वपदी कार्यरत राहणे रास्त ठरत नाही, अशी गांगुलीची भूमिका होती.
अशी असेल बीसीसीआयची नवी कार्यकारिणी
अध्यक्ष ः रॉजर बिन्नी
उपाध्यक्ष ः राजीव शुक्ला
सचिव ः जय शाह
आयसीसीमध्ये भारताचे प्रतिनिधी ः जय शाह
खजिनदार ः आशिष शेलार
आयपीएल चेअरमन ः अरुण सिंग धुमल
संयुक्त सचिव ः देवजीत सायकिया









