बोलिव्हीया नामक दक्षिहा अमेरिकेतील देशात यंत्रमानव न्यायाधीशाचे काम करत असल्याची माहिती नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. आता खेळांच्या सामन्यांमध्येही यंत्रमानव ‘पंच’ किंवा ‘अंपायर’ म्हणून काम पाहणार आहेत. हा प्रयोग अमेरिकेत केला जाणार आहे. अमेरिकेच्या जगप्रसिद्ध ‘मेजर बेसबॉल लीग’मध्ये यंत्रमानव पंचांच्या भूमिकेत दिसून येतील. या बेसबॉल लीग स्पर्धेच्या व्यवस्थापनाची बैठक 23 सप्टेंबरला झाली होती. 2026 च्या, अर्थात पुढच्या वर्षीच्या स्पर्धेत कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित तंत्रज्ञानाच्या आधारावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रमानवांना पंच म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अर्थात, या स्पर्धेतील सर्व पंच यंत्रमानव असणार नाहीत. तसेच यंत्रमानव किंवा रोबो यांनी दिलेले निर्णय प्रारंभीच्या काळात पारखूनच स्वीकारले जाणार आहेत. ते अचूक असतात अशी शाश्वती निर्माण झाल्यानंतरचे हे काम स्वतंत्ररित्या यंत्रमानवाच्या आधीन करण्याचा विचार होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. ‘यंत्रपंचां’ची ही व्यवस्था ‘ऑटोमेटेड बॉल-स्ट्राईक सिस्टिम’ किंवा एबीएस या नावाने ओळखली जाणार आहे. अशा तऱ्हेचे ‘यंत्रपंच’ निर्माणही करण्यात आले असून त्यांची परीक्षणे केली जात आहेत. हा प्रयोग यशस्वी झाला, तर एक नवी समस्याही निर्माण होऊ शकते, असे आक्षेपही घेण्यास आतापासूनच प्रारंभ झाला आहे. हे ‘यंत्रपंच’ मानवी पंचांपेक्षाही अधिक अचूक निर्णय देण्यास सक्षम आहेत, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. कारण त्यांच्यात मानवी भावभावना आणि त्यांच्यातून निर्माण होणारी पक्षपाती वृत्ती यांना कोणतेही स्थान नसते. बेसबॉल लीगमध्ये ‘यंत्रपंच’ प्रयोग यशस्वी झाल्यास तो क्रिकेट किंवा अन्य खेळांमध्येही करण्यात येईल, हे निश्चित आहे. अर्थातच, प्रारंभीच्या काळात कोणत्याही तंत्रज्ञानाला किंवा परिवर्तनाला होतो, तसा या प्रयोगांनाही कडाडून विरोध होणार, हे निश्चित आहे. नवे वादही निर्माण होणार आहेत. नैतिकतेचा प्रश्न आणि तंत्रवैज्ञानिक आक्षेपही घेतले जातील. पण कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाची सर्व क्षेत्रांमधील मुसंडी कोणीही रोखू शकणार नाही, अशी स्थिती सध्यातरी आहे हे निश्चित.









