कर्मचाऱयांची नाही या देशात गरज
भारताप्रमाणे प्रत्येक देशात पेट्रोल पंपावर इंधन भरणारा कर्मचारी नसतो. विदेशात हे काम स्वतःच करावे लागते. परंतु दिवेशात स्वतःची कार पंप किंवा गॅस स्टेशनवर योग्य ठिकाणी उभी केल्यास आणि इंधन भरण्याचे काम तुमच्याऐवजी अन्य कुणी केले तर तुम्ही नक्कीच आनंदून जाल.
डॅनिश स्टार्टअप ऑटोफ्यूलने एक असा रोबोट तयार केला आहे, जो पेट्रोल पंप म्हणजेच गॅस स्टेशनवर कारमध्ये इंधन भरण्याचे काम करतो. म्हणजेच या गॅस स्टेशनवर कारचालकाला खाली उतरण्याची गरज भासत नाही. कार पोहोचताच रोबोटिक आर्मद्वारे इंधन भरले जाते. कंपनीनुसार अशी सुविधा देणारा हा जगातील पहिला आणि एकमात्र फ्यूल पंप आहे.

फ्यूल स्टेशनला भारतात सर्वसाधारणपणे पेट्रोल पंप म्हटले जाते. डॅनिश स्टार्टअपचा रोबोट सेंसर आणि कॅमेऱयाच्या मदतीने काम करतो. तेथे कार येताच कॅमेरा रजिस्ट्रेशनयुक्त नंबरप्लेट वाचून यात कुठले इंधन भरायचे हे ठरवतो. म्हणजेच पेट्रोल इंजिनयुक्त कारमध्ये पेट्रोल तर गॅसच्या कारमध्ये गॅस भरला जातो. रोबोट याचा निर्णय नंबर प्लेट रीड करून घेत असतो. यानंतर याचा दुसरा कॅमेरा कारला इंधन भरता येईल अशा ठिकाणी नेण्यासाठी सूचना करतो. योग्य ठिकाणी कार स्थिरावताच रोबोट कारच्या फ्यूल टँकचे कव्हर काढतो. इंधन भरल्यावर या रोबोटमधील सेंसर टँक फूल झाल्याचे सांगतो आणि ओव्हरफ्लो होण्यापूर्वीच रोबोट इंधन भरण्याचे काम रोखतो.
परंतु ही सुविधा सध्या प्रारंभिक टप्प्यात आहे. अनेक कारचालकांनी स्वतःच्या फीडबॅकमध्ये याच्या त्रुटी नमूद केल्या आहेत. रोबोट अत्यंत हळूहळू इंधन भरण्याची प्रक्रिया पूर्ण करत असल्याची तक्रार आहे. रेग्युलेशनच्या दृष्टीकोनातून परीक्षणादरम्यान सुरक्षेसाठी वेग कमी ठेवणे आवश्यक असल्याचे कंपनीने याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. याचप्रकारे रोबोट केवळ ऑटोफ्यूल कंपनीसोबत नोंदणीकृत असलेल्या वाहनांमध्येच इंधन भरू शकतो. अशा स्थितीत कारचालक स्वतःची माहिती कंपनीला पुरवू इच्छित नसल्यास रोबोट इंधन भरणार नाही.









