चीन या देशाने यंत्रमानव किंवा रोबोच्या निर्मितीशास्त्रात चांगलीच प्रगती केली आहे. गेल्या काही वर्षांपासून या देशात अनेक कामे आता मानवाऐवजी यंत्रमानवांकडून करुन घेतली जात आहे. आपण रक्तदान करतो, तेव्हा आपल्या शरीरातील रक्त विशिष्ट प्रमाणात काढून घेण्यात येते. तसेच आपल्या रक्ताची तपासणी करण्याची सूचना जेव्हा डॉक्टर्स करतात, तेव्हाही आपले रक्त काढून घेतले जाते. हे काम मानवच काही साधनांचा उपयोग करुन करत असतात. पण आता चीनमध्ये या कामासाठी यंत्रमानवाचा उपयोग मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. यामुळे मानवी श्रमांची बचत होत आहे. तसेच, एकदा गुंतवणूक केली, की पुढे बरीच वर्षे अत्यंत कमी खर्चात हा यंत्रमानव आपल्याला सेवा देतो. तसेच, तो कधीही थकत नाही किंवा संपावर जात नाही. तसेच वेतनवाढीची मागणीही करत नाही. हे त्याचे लाभ लक्षात घेऊन चीनने यंत्रमानवांचे उत्पादन वाढविले आहे.
यंत्रमानव रक्त काढण्याचे काम केवळ कमी खर्चात करतो, असे नाही. तर त्याच्या कामाची अचूकता 94 टक्के इतकी मोठी असते. कितीही कौशल्यवान मानव असला तरी त्याची या कामातील अचूकता 80 ते 85 टक्के असते. त्यामुळे अचूकता आणि वेग यांच्या संदर्भातही यंत्रमानव माणसावर मात करु लागले आहेत. मात्र, त्यांचे सर्व सूत्रसंचालन मानवाच्याच हाती असल्याने ते नैसर्गिक मानवाशी स्पर्धा करु शकत नाहीत, असे तज्ञांचे मत आहे. सध्या रक्त काढण्यासाठी यंत्रमानवाचा उपयोग प्रायोगिक तत्वावर करण्यात येत आहे. काही वर्षांच्या नंतर अशा वैद्यकीय सेवा देणाऱ्या यंत्रमानवांचे उत्पादन व्यापारी तत्वावर होण्याची शक्यता आहे. आज जगात भारतासह अनेक देशांमध्ये यंत्रमानवांच्या निर्मितीचे तंत्रज्ञान वेगाने विकसीत होत आहे. त्यामुळे येत्या चार ते पाच वर्षांमध्ये विकसनशील देशांमध्ये असे वैद्यकीय यंत्रमानव सर्रास दिसू लागणे शक्य आहे.









