बेंगळूर : भारतीय फलंदाज रॉबिन उत्थप्पाने बुधवारी सर्व क्रिकेट प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. उत्थप्पाने यापूर्वी 2015 मध्ये भारतीय संघाचे शेवटचे प्रतिनिधीत्व केले होते. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केली. भारत व कर्नाटक संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी लाभणे माझ्यासाठी सन्मानाचे होते, असे उत्थप्पा याप्रसंगी म्हणाला. उत्थप्पाने भारतीय संघातर्फे 46 वनडे व 13 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने 46 वनडेतील 42 डावात 25.94 च्या सरासरीने 934 धावा केल्या व यात 6 अर्धशतकांचा समावेश राहिला.
त्याने याशिवाय, 13 टी-20 सामन्यात 24.90 च्या सरासरीने 249 धावांचे योगदान दिले. यात त्याने एक अर्धशतक फलकावर लावले. 50 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली. भारताने उद्घाटनाची आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा जिंकली, त्यात उत्थप्पा संघात समाविष्ट होता. त्याने केकेआर व चेन्नई सुपरकिंग्स संघातर्फे अनुक्रमे 2014 व 2021 साली आयपीएल जेतेपदही पटकावले.









