ईडीने दाखल केले आरोपपत्र : न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नुकतेच आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात त्यांनी गुह्यातून 58 कोटी रुपये कमावल्याचा दावा करण्यात आला आहे. ही रक्कम त्यांना दोन कंपन्यांद्वारे प्राप्त झाली. वाड्रा यांनी या पैशाचा वापर त्यांच्या कंपन्यांच्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी केल्याचेही ईडीने आरोपपत्रात नमूद केले आहे.
ईडीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यामुळे आता त्यावर सुनावणी होईल. जर न्यायालयाने आरोप निश्चित केले तर वाड्रा यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) शिक्षा होऊ शकते. सध्या, वाड्रा यांनी या आरोपांवर सार्वजनिकरित्या कोणताही तपशीलवार प्रतिसाद दिलेला नाही. ईडीच्या मते, कथित 58 कोटी रुपयांपैकी 5 कोटी रुपये ब्लू ब्रीझ ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड (बीबीटीपीएल) आणि 53 कोटी रुपये स्काय लाईट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडद्वारे (एसएलएचपीएल) आले. दोन्ही कंपन्या वाड्रा यांच्या व्यवसाय नेटवर्कशी जोडल्या गेल्याचे सांगितले जाते. ही रक्कम अयोग्य मार्गाने बेकायदेशीर कमावण्यात आल्याचे तपास यंत्रणेने म्हटले आहे.
पैशाच्या वापराबद्दल ईडीचा दावा
रॉबर्ट वाड्रा यांनी बेकादरेशीर मार्गाने मिळवलेले पैसे अनेक प्रकारे वापरले. यामध्ये रिअल इस्टेट व्यवहार सांभाळणे, वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणूक करणे, कंपन्यांना कर्ज देणे आणि समूह कंपन्यांची थकबाकी भरणे यासारख्या क्रियाकलापांचा समावेश आहे. हे सर्व काम बेकायदेशीर कमाईतून झाल्यामुळे ते मनी लाँडरिंग अंतर्गत गुन्हा मानले जाते, असे ईडीने आरोपपत्रात म्हटले आहे.
पुरावे गोळा करण्यात ईडीला यश
तपासादरम्यान बँक व्यवहार, कंपनी रेकॉर्ड आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे हा आर्थिक व्यवहार ट्रॅक करण्यात आला. ज्या कंपन्यांद्वारे पैसे आले ते वाड्रा यांचे जवळचे सहकारी चालवत होते, असे ईडीचे म्हणणे आहे. या सर्व आर्थिक व्यवहारांदरम्यान काही जणांचा वापर पैशाला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी केला जात होता, असेही ईडीने स्पष्ट केले आहे.









