रॉबर्ट सॅम्युअल्स/ सेंट जोन्स
विंडीज महिला क्रिकेट संघाच्या हंगामी प्रमुख प्रशिक्षकपदी माजी वेगवान गोलंदाज रॉबर्ट सॅम्युअल्सची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा क्रिकेट विंडीजने केली आहे. विंडीज आणि आयर्लंड यांच्यात आगामी होणाऱ्या मालिकेवेळी रॉबर्ट सॅम्युअल्सचे विंडीज महिला क्रिकेटपटूंना मार्गदर्शन लाभणार आहे.
चालू वर्षाच्या प्रारंभी क्रिकेट विंडीजने आपल्या प्रशिक्षक वर्गामध्ये अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. विंडीजचा माजी वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्श यांचा रॉबर्ट सॅम्युअल्स हे सहकारी म्हणून ओळखले जात असे. यापूर्वी कोर्टनी वॉल्श यांच्या समवेत सॅम्युअल्स हे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. दरम्यान, 52 वर्षीय रॉबर्ट सॅम्युअल्स यांना सहाय्यक प्रशिक्षकावरुन प्रमुख प्रशिक्षकपदी बढती देण्याचा निर्णय क्रिकेट विंडीजने घेतला आहे. आता ते विंडीज महिला क्रिकेट संघाचे हंगामी प्रमुख प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहतील. विंडीज आणि आयर्लंड महिला क्रिकेट संघातील मालिका चालू महिन्याच्या अखेरीस विंडीजमध्ये खेळविली जाणार आहे. रॉबर्ट सॅम्युअल्स यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत जमैका संघाचे नेतृत्त्व केले असून ते विंडीज संघातील सलामीचे फलंदाज होते. सॅम्युअल्स यांनी आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत 6 कसोटी आणि 8 वनडे सामन्यात विंडीजचे प्रतिनिधित्व केले आहे. 1997 साली पर्थ येथे झालेल्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात विंडीजने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. या सामन्यात सॅम्युअल्स यांनी पहिल्या डावात 76 तर दुसऱ्या डावात नाबाद 35 धावा जमविल्या होत्या. आयर्लंड आणि विंडीज महिला क्रिकेट संघामध्ये 3 वनडे सामने खेळविले जाणार असून पहिला सामना 26 जूनला सेंट ल्यूसिया येथे होणार आहे. त्यानंतर उभय संघात 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेला 4 जुलैपासून प्रारंभ होईल.