इंटरलॉक तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लांबवली
प्रतिनिधी/ बेळगाव
एका बंद घराचा इंटरलॉक तोडून चोरट्यांनी सुमारे 27 लाख 41 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड पळविली आहे. शुक्रवार दि. 20 डिसेंबर रोजी सायंकाळी काँग्रेस रोडवर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून टिळकवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
संपूर्ण पोलीस यंत्रणा गेले पंधरा दिवस विधिमंडळ अधिवेशनात गुंतलेली होती. अधिवेशनानंतर आता काँग्रेस अधिवेशनाच्या शतकमहोत्सवाच्या बंदोबस्तात यंत्रणा गुंतली आहे. याचवेळी शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्या वाढल्या असून काँग्रेस रोडवर झालेल्या घरफोडीमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
दत्तप्रसाद दीपक कोलवेकर, रा. काँग्रेस रोड, टिळकवाडी यांनी फिर्याद दिली आहे. गुरुवार दि. 19 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता आपल्या घराला कुलूप लावून नातेवाईकांच्या लग्न समारंभात भाग घेण्यासाठी घरातील सर्व मंडळी बैलहोंगलला गेली होती. लग्न आटोपून दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि. 20 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ते आपल्या घरी परतले. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती समजताच खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच., टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. चोरट्यांनी इंटरलॉक तोडून घरात प्रवेश केला आहे. पहिल्या मजल्यावरील बेडरूममधील कपाट फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड पळविली आहे.
उपलब्ध माहितीनुसार 311 ग्रॅम सोन्याचे दागिने, 6 किलो चांदी, 80 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 27 लाख 41 हजार रुपये किमतीचा ऐवज पळविला आहे. यासंबंधी भारतीय न्याय संहिता 331(2), 331(4), 305 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर चोरट्यांनी पळविला
चोरट्यांनी दत्तप्रसाद यांच्या घरातील हिऱ्याची कर्णफुले, 17 जोड सोन्याची कर्णफुले, 18 अंगठ्या, बांगड्या, ब्रेसलेट, नेकलेस, चांदीच्या तीन समई, दोन तांबे, दोन ग्लास, दोन प्लेट, पंचपात्र, दिवे पळविले आहेत. दत्तप्रसाद यांच्या घरी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्याचा डीव्हीआर चोरट्यांनी









