पुणे / वार्ताहर :
माथाडीच्या नावाखाली व्यावसायिक आणि कामगारांमध्ये दहशत माजवून लुटमार करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे.
रमाकांत राजेंद्र जोगदंड (वय 30, रा. वाकड, पुणे), समीर नझीर शेख (33, रा. काळेवाडी, पुणे), मयुर बाळासाहेब सरोदे (23, रा. पुनावळे, पुणे) व करण सदाफळ चव्हाण (24, रा. पुनावळे, पुणे) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड परिसरातील माऊली चौकात 5 जुलै रोजी तक्रारदार अनिकेत रवींद्र वाडीया (वय 24, रा. शिवाजीनगर, पुणे) यांच्या रेजीम व्हिस्टा फॅसिलीटीस सर्व्हिसेस प्रा.लि.चे असिस्टंट मार्केटिंग एक्झीक्युटीव्ह सुर्यकांत वाघमारे व रोहन कांबळे हे प्रमोशनल ऍक्टीव्हीटी करत होते. त्यावेळी त्याठिकाणी पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर गाडीतून आरोपी जोगदंड व त्याच्यासोबत आणखी दोन ते तीनजण आले. त्यांनी तक्रारदार व त्यांच्या सहकाऱ्यांना मी माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे. माझ्या परवानगी शिवाय येथे कामगार कसे ठेवले? काम कसे काय करत आहात? अशी विचारणा करत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी आरोपींनी तक्रारदार यांच्या हातातील टायटनचे घडयाळ व सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून नेली. यावेळी झालेल्या मारहाणीत त्यांच्या डोक्याला, पोटाला, कंबरेला आणि पायाला मार लागला. त्यामुळे त्यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी तपास सुरू केला. आरोपींना वाशी, नवी मुंबई येथे सापळा रचून अटक केली. त्यानुसार जोगदंड याच्याकडे तपास केला असता त्याने गुन्हयाची कबुली दिली. रमाकांत जोगदंड (30) हा सराईत गुन्हेगार असून तो माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षारक्षक, जनरल कामगार युनियनचा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आहे.









