बैलहोंगल पोलिसांची कारवाई : 6.70 लाखाचा ऐवज जप्त
बेळगाव : बैलहोंगल परिसरात झालेल्या लूटमारी प्रकरणी गोकाक तालुक्यातील चौकडीला अटक करण्यात आली आहे. बैलहोंगल पोलिसांनी ही कारवाई केली असून जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. बसवराज सिद्दाप्पा गोधी (वय 30) सिद्धारूढ मायाप्पा धर्मटी (वय 22), मुत्याप्पा विठ्ठल किलारी (वय 25), बसवराज बीरसिद्दाप्पा पुजेरी (वय 26) अशी त्यांची नावे आहेत. सर्वजण मुळचे गोकाक तालुक्यातील बेनचमर्डीचे राहणारे असून सध्या पारनट्टी येथे त्यांचे वास्तव्य आहे. मोटरसायकलवरून येऊन लूटमारी करण्यात या चौकडीचा हातखंडा असून त्यांनी दोन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याजवळून साडेबारा ग्रॅमची चेन, 50 ग्रॅमचे मंगळसूत्र, गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली मोटरसायकल असे एकूण 6 लाख 70 हजार किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक डॉ. वीरय्या हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद यलिगार, उपनिरीक्षक पी. एस. मुरनाळ, गुरुराज कलबुर्गी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.









