पुणे / वार्ताहर :
बारामती शहरातील देवकातेनगरमध्ये चार महिन्यांपूर्वी पाच दरोडेखोरांनी एका घरावर जबरी दरोडा घातला. चोरटय़ांनी सोने चांदीच्या दागिन्यांसह तब्बल एक कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या गुन्ह्यातील 5 दरोडेखोरांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली आहे. पोलीस तपासात त्यांनी एका ज्योतिषाच्या सांगण्यावरून ही चोरी केल्याचे कबूल केले आहे. यासाठी चोरटय़ांनी मुहूर्त काढला होता आणि त्या मुहूर्तावर चोरी केल्याने सर्व आरोपी खुशीत होते. यातुनच त्यांनी बालाजी, शिर्डी येथे जात देवदर्शन घेत दानधर्म देखील केल्याचे तपासात उघड झाले आहे.
दुर्योधन ऊर्फ दीपक ऊर्फ पप्पू धनाजी जाधव (वय 35, व्यवसाय-खासगी नोकरी, रा. जिंती, हायस्कुलचे जवळ ता. फलटण, जि. सातारा), सचिन अशोक जगधने (30, व्यवसाय – नोकरी, रा. गुणवडी, 29 फाटा, जि. प. शाळेजवळ, ता. बारामती) रायबा तानाजी चव्हाण (32, व्यवसाय – चालक, रा. शेटफळ हवेली, जाधववस्ती, कॅनॉलजवळ, ता. इंदापूर), नितीन अर्जुन मोरे (36, व्यवसाय खासगी नोकरी, रा. धर्मपुरी, ता. माळशीरस, जि सोलापूर), रविंद्र शिवाजी भोसले (27, व्यवसाय-नोकरी, रा. निरा वागज, ता. बारामती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर रामचंद्र वामन चव्हाण (43, व्यवसाय – शेती, ज्योतीष, मूळ रा. आंदरूड ता. फलटण जि. सातारा) असे ज्योतिषाचे नाव आहे. याबाबत सागर शिवाजी गोफणे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
पोलीस आयुक्त अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामतीत 21 एप्रिलला भरवस्तीत ही घटना घडली होती. सागर गोफणे यांच्याकडे जमिनीच्या व्यवहारातून मोठी आर्थिक रक्कम आलेली होती. दरम्यान, गोफणे हे तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळी त्यांची पत्नी ही घरी एकटी होती. वरील पाच दरोडेखोरांनी रामचंद्र चव्हाण या ज्योतिषाच्या सांगण्यावरुन गोफणे यांच्या घरी दरोडा टाकला. गोफणे यांची पत्नी ही घरी एकटीच होती. चोरटय़ांनी त्यांचे हात पाय बांधून 95 लाख 30 हजार रूपये रोख रक्कम व सुमारे 20 तोळे वजनाचे 11 लाख 59 हजार 300 रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि मोबाइल असा असा एकूण 1 कोटी 7 लाख 24 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.
चोरीच्या या घटनेमुळे खळबळ उडाल्याने पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने तातडीने पोलीस पथकाची स्थापना करत आरोपींचा शोध घेतला. सीसीटीव्ही, गोपनीय बातमीदार, तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत चार महिन्यांनी आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींची चौकशी केली असता सागर गोफणे यांच्याकडे जमिनीच्या व्यवहारातून भरपूर पैसे असलेची माहिती आरोपी सचिन जगधने यास मिळाली होती, त्याने गुन्हयाचा कट रचला. यासाठी ज्योतिषी रामचंद्र चव्हाण यांच्याकडून मुहूर्त देखील काढला होता. आरोपींकडून 76 लाख 32 हजार 490 रूपये किंमतीचाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यामध्ये 60 लाख 97 हजार रुपये रोख रक्कम व 15 लाख 35 हजार 410 रुपये किंमतीचे 26 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
चोरी करून दानधर्म
आरोपींनी मुहूर्त काढत चोरी केली. ही चोरी यशस्वी झाल्याने त्यांनी तिरूपती बालाजी आणि शिर्डी येथे जाऊन दर्शन घेतले. तसेच तेथे दानधर्म देखील केले होते.
चोरीच्या पैशातून बनवले दागिने
आरोपींनी चोरीच्या पैशातून दागिने बनवले होते. हे दागिने चोरी केल्याच्या एक वर्षानंतर विकून ते पैसे घेणार होते. मात्र, त्याआधीच पोलिसांनी त्यांचे मनसुबे हाणून पाडले.









