नेपोलियनच्या संग्रहातून 9 अमूल्य दागिने चोरीला : केवळ 7 मिनिटात केला गुन्हा
वृत्तसंस्था/ पॅरिस
फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील लूव्र संग्रहालयात रविवारी दरोड्याची घटना घडली आहे. यात नेपोलियनच्या संग्रहालयातील 9 दागिने पळविण्यात आले आहेत. सीन नदीच्या समोरील हिस्स्यातून दरोडेखोर संग्रहालयाच्या इमारतीत शिरले, तेथे सध्या बांधकाम सुरू असून त्याचा लाभ या गुन्हेगारांनी घेतला. अपोलो गॅलरीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी मालवाहू लिफ्टचा वापर केला. यानंतर लुटारूंनी नेपोलियन आणि महाराणीच्या दागिने संग्रहातून 9 मूल्यवान दागिने चोरले आहेत.
फ्रान्सच्या लूव्र संग्रहालयात रविवारी चोरीची घटना घडल्यावर इमारत दिवसभरासाठी बंद करण्यात आली. तपास यंत्रणांनी या घटनेला दरोडा मानले असल्याची माहिती फ्रान्सच्या सांस्कृतिक मंत्री रजिदा दाती यांनी दिली आहे. या घटनेत कुणीच जखमी झालेले नाही. याप्रकरणी तपास केला जात असून संग्रहालय असाधारण कारणांमुळे बंद राहणार असल्याचे दाती यांनी सांगितले.
दरोड्यात एकाहून अधिक गुन्हेगारांचा सहभाग होता अशी पुष्टी पॅरिस पोलिसांनी दिली आहे. दरोड्याची परिस्थिती आणि चोरी झालेल्या दागिन्यांची पूर्ण यादी तयार करण्यासाठी अधिकारी काम करत आहेत. या घटनेतील संशयितांविषयी अधिक माहिती देणे तूर्तास पोलिसांनी टाळले आहे.
पॅरिसचे लूव्र संग्रहालय जगातील सर्वात मोठ्या संग्रहालयांपैकी एक आहे. हे जगात सर्वाधिक लोकांना आकर्षित करणारे संग्रहालय आहे. यामागील कारण यात प्रागैतिहासिक काळापासून 19 व्या शतकापर्यंतच्या कलाकृती असणे आहे. लूव्र संग्रहालय सीन नदीच्या काठावर आहे. संग्रहालयाची इमारत पूर्वी लूव्रचा राजमहाल होता. लियोनार्डो दा विंचीचे मोनालिसा पेंटिंग या संग्रहालयाचे विशेष आकर्षण आहे.









