पोलिसाची सतर्कता, कणबर्गीच्या दोघांना अटक : रामतीर्थनगरातील घटना
प्रतिनिधी/ बेळगाव
रामतीर्थनगर येथील एक सराफी दुकान फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. रात्रीच्या गस्तीवरील एका पोलिसाने दाखविलेल्या सतर्कतेमुळे सराफी दुकान फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. माळमारुती पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
किरण कृष्णा यळ्ळूरकर (वय 28), रोहित केदारी उचगावकर (वय 24, दोघेही रा. सिद्धेश्वर गल्ली, कणबर्गी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, गुन्हे तपास विभागाचे उपनिरीक्षक श्रीशैल हुलगेरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. किरण व रोहित यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
रामतीर्थनगर येथील श्री कामाक्षी ज्वेलर्स फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. गुरुवार दि. 26 डिसेंबर रोजी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास ऑक्सिजन सिलिंडर, एलपीजी सिलिंडरचा वापर करून गॅस कटरच्या साहाय्याने सराफी दुकान फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, या प्रयत्नात किरण व रोहित यांना यश आले नाही.
याचवेळी रामतीर्थनगर परिसरात गस्तीवर असलेले माळमारुती पोलीस स्थानकाचे मल्लिकार्जुन गाडवी या पोलिसाने संशयाने या दोन्ही तरुणांना हटकले. त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात नेले. त्याचवेळी पोलीस उपनिरीक्षक श्रीशैल हुलगेरी हेही रात्रीच्या गस्तीवर होते. या सर्व अधिकाऱ्यांनी या जोडगोळीची कसून चौकशी केली असता त्यांनी सराफी दुकान फोडण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली.
कॅसिनोच्या व्यसनापायी चोरीचा प्रयत्न
रात्रीच्या गस्तीवरील पोलीस वेळेत पोहोचला नसता तर सराफी दुकान फोडण्यात या दोघांना यशही आले असते. दुकानमालक चेतन वासुदेव शिरोडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कॅसिनोच्या व्यसनापायी दुकान फोडण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली आहे.









