केपीसीकडून नागरिकांसाठी होडीची व्यवस्था
कारवार : सुपा (जोयडा) तालुक्यातील काळी नदीवरील गणेशगुढी जलाशयातील पाण्याची पातळी जसजशी वाढत जाते, तसतसे कर्नाटक ऊर्जा महामंडळाच्या अपेक्षा उंचावत जातात. कारण गणेशगुढी जलाशयात अधिक पाणी म्हणजे महामंडळाकडून अधिक ऊर्जा निर्मिती. परिणामी महामंडळाच्या महसूलात वाढ. असे असताना जलाशयाच्या पाण्यात वाढ होणे म्हणजे, जोयडा तालुक्यातील काही गावातील ग्रामस्थांच्या अडचणीत वाढ होणे होय. कारण जलाशयातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली की, बॅकवॉटरमुळे जोयडा तालुक्यातील काही रस्ते पाण्याखाली जातात. परिणामी अनेक गावांचा जोयडा तालुक्याचे मुख्यालय असलेल्या जोयड्याशी संपर्क तुटतो. काळी नदीवर सुपा धरण उभारुन 40 वर्षांचा कालावधी लोटला आहे. या 40 वर्षात हे धरण केवळ 4 वर्षे (1994, 2006, 2018 आणि 2019) तुडूंब भरले आहे. यावर्षी हे धरण तुडूंब भरायला अद्याप 4 मी. पाण्याची गरज आहे. आजअखेर या महत्त्वपूर्ण जलाशयातील पाण्याची पातळी 559.60 मी. इतकी झाली आहे. या जलाशयातील कमाल पाण्याची पातळी 564 मी. इतकी आहे. जलाशयात 147.55 टीएमसी इतके पाणी साठविण्याचे सामर्थ्य असून आजअखेर हे सामर्थ्य 128 टी.एम.सी. इतके झाले आहे.
धरण तुडूंब भरण्यापूर्वीच रस्ते पाण्याखाली
बाझारकुणांग ग्रामपंचायतीच्या व्याप्तीतील करंजे-दुधमाळ रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे करंजे गावचा तालुका केंद्राशी संपर्क तुटला आहे. बॅकवॉटरमुळे रस्ता पाण्याखाली गेल्याने नागरिकांनी कर्नाटक विद्युत महामंडळाकडे होडीची व्यवस्था करण्याची मागणी केली होती. बाझारकुणांग ग्रामपंचायतीच्या मागणीची दखल घेऊन केपीसीने मंगळवारी होडीची व्यवस्था केली आहे. दरम्यान प्रशासन आणि केपीसीने नागरिकांना धरण परिसरात सावधगिरी बाळगण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.









