इम्रान गवंडी,कोल्हापूर
शहरातील रस्त्यांची दयनीय झालेली अवस्था पाहून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती निर्माण झाली आहे.महापालिकेने विविध कामासाठी केलेली खोदाई व काम झाल्यानंतर डांबरीकरण न करता आहे तीच मुरूम माती पसरल्यामुळे अनेक रस्त्यांची पुरते वाट लागली आहे.खड्डा,खडी,माती, चिखलाचा सामना करत वाहन चालवताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे.काही रस्त्यांवर तर चालणेही मुश्किल झाले आहे.अशा रस्त्यावरून प्रवास नको रे बाबा.. असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
महापालिकेकडून केलेल्या रस्त्यांचे डांबर सहा महिन्यातच गायब होते. एकाच पावसात डांबर धुवुन जाते व शिल्लक फक्त खडी, मातीच राहते. त्यामुळे या रस्त्यांच्या दर्जाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. त्या तुलनेत आयआरबीने केलेले 49 किलोमीटरचे सिमेंट व डांबराचे रस्ते 12 वर्ष झाले तरी टिकुन आहेत.मनापाकडून मुरूम व माती टाकुन ख•dयांचे पॅचवर्क केले जाते. यामध्ये मुरूमपेक्षा मातीचे प्रमाण अधिक असते.त्यातच खोदाई केलेल्या खड्ड्यातील मातीही रस्त्यावर तशीच पडलेली असते.पाऊस पडल्यास चिखल व पाऊस उघडल्यावर प्रचंड प्रमाण धुळ उडत असल्याने नागरिकांना दुहेरी समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
खड्ड्यामुळे रोज कुठे ना कुठे अपघाताच्या घटना घडत आहेत.चिखलातून गाडी घसरणे,खड्डा चुकविताना अपघात होत आहेत.खड्ड्यातून गाडी आदळल्याने हाडे खिळखिळी होण्याबरोबरच वाहनाचेही नुकसान होत आहे.दवाखान्यातील औषधोपचराच्या खर्चा बरोबरच गाडी दुरूस्तीसाठी होणाऱ्या खर्चामुळे नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे. याच्या कामासाठी येणारा खर्च हजाराच्या पुढे येत असल्याचे मॅकेनिक सांगत आहेत.
मणक्यांचे आजार उद्भवण्याचा धोका
खड्ड्यात गाडी आदळ्याने पाठीच्या मणक्याचे आजार उद्भवण्याची शक्यता असल्याने खड्ड्यातून सावकाश गाडी चालविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.सतत खड्ड्यातून वाहन चालविल्याने दुचाकीच्या फोर्कला आऊट येणे,सस्पेन्शन खराब होणे,पंक्चर होणे,रिमला आऊट येणे आदी कामे निघतात.
उपनगरात डर्ट ट्रॅकचा अनुभव
वाढत्या नागरिकीकरणामुळे उपनगराचा विस्तार वाढत आहे.गेल्या 30 ते 40 वर्षापूर्वी वसलेल्या अनेक कॉलन्यातील रस्त्यावर अजुनही डांबरच पडलेले नाही.काही ठिकाणी रस्ते होऊन अनेक वर्षांचा कालावधी उलटला असुन फक्त खडी व मातीच शिल्लक आहे.पावसाळ्यात येथे डर्ट ट्रॅकचा अनुभव येतो.
नंगीवली चौक ते मिरजकर तिकटी रस्ता हरवला खड्ड्यात
अमृत योजना,थेट गॅसपाईपलाईन योजनेतील कामासाठी रस्त्यांची खोदाई झाली.यामध्ये थेट गॅसपाईपलाईन कंपनीने रिस्टॉलेशनची रक्कम देऊनही मनपाने रस्ते केलेले नाहीत. या उलट अमृत योजनेतील ठेकेदाराने पाईपलाईन टाकली पण रिस्टॉलेशन केलेले नाही.नंगीवली चौक ते मिरजकर तिकटी मार्गावर अमृत योजनेतून पाईपलाईन टाकून दोन महिने झाले तरीही रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही.पॅचवर्कची तात्पुरती मलमपट्टी केली आहे.पावसामुळे सर्व खडी, माती रस्त्यावर पसरली आहे.खड्ड्यातून रस्ता शोधतच मार्ग काढावा लागत आहे.
दोन महिने कर्मचारी फिरकलेच नाहीत
मिरजकर तिकटी येथील मारूती मंदिराजवळ मनपाने पाईपलाईनच्यासाठी दोन महिन्यापूर्वी खोदाई केली आहे.अजुनही येथील काम अपूर्णच आहे.निम्म्या रस्त्यापर्यंत खोदाई झाल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.दोन महिने उलटून गेले तरी मनपा कर्मचारी याठिकाणी फिरकलेच नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.शहरातील इतरही भागातही अर्धवट कामे ठेवल्याचे चित्र दिसून येत आहे.
खोदाई व खड्ड्याचे मार्ग
बिनखांबी ते मिरजकर तिकटी,निवृत्ती चौक ते शिवाजी पेठ,मारूती मंदिर,साकोली कॉर्नर ते रंकाळा स्टँड,गंगावेश ते रंकाळा स्टँड,दसरा चौक ते बिंदू चौक,मिरजकर तिकटी ते नंगीवली चौक,छत्रपती संभाजी नगर मार्ग, सायबर ते राजारामपुरी,खानविकर पेट्रोल पंपा आदी मार्गासह उपनगरातील फुलेवाडी,आपटेनगर,जीवबानाना पार्क,कसबा बावडा, कमदवाडी,आर.के.नगर, राजेंद्रनगर, शेंडापार्क
धक्के खातच प्रवास
सुरक्षित प्रवासासाठी खोदलेल्या रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर तत्काळ डांबरीकरण होणे गरजेचे आहे. पावसात चिखल व उन्हाळ्यात धुळीचा सामना करावा लागत आहे. ख•dयांत गाडी आदळल्याने गाडीची वारंवार कामे करून घ्यावी लागतात.
सारंग आमते, सानेगुरूजी वसाहत.









