वर्दळीचा रस्ताही धोकादायक : लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष कारणीभूत : अधिकाऱयांनी उपाययोजना करण्याची मागणी

वार्ताहर /किणये
बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील मुख्य व संपर्क रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्डय़ांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यांवरून वाहतूक करणे अवघड बनले आहे. या भागातील रस्ते अक्षरशः खड्डय़ांमध्ये हरवले आहेत.
प्रशासनामार्फत रस्त्यांसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात येतो. मात्र, पश्चिम भागातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून अनेक वर्षांपासून या रस्त्यांकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत.
निवडणूक प्रचार काळात रस्ते, पाणी, गटारी आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या घोषणा केल्या जातात. एकदा निवडणूक झाली आणि निवडून आल्यानंतर मात्र ग्रामपंचायत सदस्य ते लोकप्रतिनिधी या साऱयांचेच दुर्लक्ष होते. नागरिकांच्या मूलभूत सविधांऐवजी ज्या कामात अधिक कमिशन मिळते त्याकडेच लोकप्रतिनिधींचा कल असतो, असे नागरिकांनी सांगितले.
रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार
कर्ले-बेळवट्टी या संपर्क रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांमध्ये पावसाचे पाणी साचले असून ये-जा करताना वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात या रस्त्याचा काही भाग वाहून गेला आहे. पावसाळय़ात या रस्त्याच्या बाजूच्या शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. लोकप्रतिनिधींना अनेकवेळा सांगूनही या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याची माहिती कर्ले व बेळवट्टी गावांतील नागरिकांनी दिली.
नावगे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. बेळगाव-चोर्ला रोडजवळील नावगे क्रॉस ते नावगे गावापर्यंतचा रस्ता धोकादायक बनला आहे. खड्डय़ांमुळे व रस्त्यावर येणाऱया पावसाच्या पाण्यामुळे वाहतूक कशी करावी, असा प्रश्न वाहनधारकांसमोर उभा ठाकला आहे. नावगे औद्योगिक वसाहत आणि नावगे गावासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पुढाकार घेणार कोण? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
काही ठिकाणी डांबरीकरण का नाही?
बेळगुंदी रस्त्यावरही मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. बोकनूर क्रॉसनंतर या रस्त्यावर खड्डे अधिक असल्याचे दिसून येत आहे. बेळगुंदी, बोकनूर, सोनोली, यळेबैल, राकसकोप, बेळवट्टी, इनाम बडस, बिजगर्णी, कावळेवाडी या भागातील वाहनधारकांची बेळगाव-राकसकोप रस्त्यावर मोठी वर्दळ असते. या रस्त्याच्या काही भागाचे डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र, काही ठिकाणी डांबरीकरण का करण्यात आले नाही? याचा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
रणकुंडये, जानेवाडी-बिजगर्णी, सोनोली-बिजगर्णी आदी रस्ते खड्डेमय बनलेले आहेत. अधिकाऱयांनी या रस्त्यांची पाहणी करून यावर उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.









