रस्त्यावर दलदल, चिखलाचे साम्राज्य, वाहतुकीला अडचण
बेळगाव : पावसाच्या जोरदार माऱ्याने शहरातील रस्त्यांची अक्षरश: दुरवस्था झाली आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत खोदण्यात आलेल्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होऊ लागला आहे. अर्धवट कामांचा कारभार पावसाने चव्हाट्यावर आला आहे. मात्र या साऱ्यांचा स्थानिक नागरिकांना मात्र मोठा फटका बसू लागला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. स्मार्ट सिटीअंतर्गत विविध ठिकाणी रस्ते, गटारी, ड्रेनेज, सिडीवर्क आणि इतर विकासकामांसाठी खोदाई करण्यात आली आहे.
मात्र पावसामुळे परिसर चिखलमय बनू लागला आहे. काही ठिकाणी खोदाईमुळे लहानसहान रस्तेही बंद झाले आहेत. त्यामुळे शहरातील अंतर्गत वाहतुकीचा प्रश्नही गंभीर बनत आहे. विविध विकासकामासाठी रस्त्यावरच दगड, माती आणि इतर साहित्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावर चिखलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी ड्रेनेज आणि गटारींच्या दुरुस्तीसाठी खोदाई करण्यात आली आहे. याचा फटका आता स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांना बसू लागला आहे. वेळेत दुरुस्तीची कामे झाली नसल्याने गटारी तुंबून पाणी घरामध्ये व दुकानांमध्ये शिरु लागले आहे.









