100 कोटी-स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासकामे राबविण्याकडे दुर्लक्ष
बेळगाव : यापूर्वी 100 कोटी अनुदानांतर्गत न्यू गांधीनगर, उज्ज्वलनगर अशा विविध परिसरातील रस्त्यांचा विकास करण्यात आला. त्यानंतर स्मार्ट सिटी यांजनेंतर्गत माळमारुती वसाहतीमधील रस्त्यांचा विकास व विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. मात्र शिवतीर्थ कॉलनी परिसरातील वसाहतींमधील रस्त्याचे डांबरीकरण देखील करण्यात आले नाही. त्यामुळे स्मार्ट सिटी म्हणजे केवळ मुख्य रस्त्यांचा विकास का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री शहर विकास अनुदानांतर्गत तीनवेळा 100 कोटीचे अनुदान मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर महात्मा गांधी शहर विकास अनुदानांतर्गत 125 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता. 425 कोटी निधी अंतर्गत शहर आणि उपनगरातील रस्त्यांचे डांबरीकरण व गटारी आणि ड्रेनेज वहिन्या घालण्यात आल्या. प्रमुख रस्त्यांचा विकास तसेच नाला बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला नाही. 100 कोटी अनुदानांतर्गत विविध गल्यांमधील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, पेव्हर्स घालणे व पथदीप सुविधा करणे अशी विविध कामे राबविण्यात आली. निधीमधून न्यू गांधीनगर व उज्ज्वलनगर त्याचप्रमाणे अन्य काही वसाहतींमधील रस्त्यांचा विकास करण्यात आला होता. मात्र या जवळच असलेल्या शिवतीर्थ कॉलनी परिसरातील रस्ते आणि गटारींच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
शिवतीर्थ कॉलनी विकासांकडे दुर्लक्ष का ?
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत 1 हजार कोटी निधीमधून विविध विकास कामे केली. या निधीअंतर्गत मुख्यता प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि माळमारुती वसाहतीमधील रस्त्यांचा विकास, उद्यानांचा विकास व ड्रेनेज वाहिन्या अशा विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. पण या निधीमधूनही शिवतीर्थ कॉलनी परिसरातील रस्त्यांचा विकास करण्यात आला नाही. त्यामुळे येथील रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत. वृंदावन कॉलनी, हार्मोनी कॉलनी, पार्वती लेआऊट, शिवतीर्थ नगर, अशा विविध वसाहतींमधील रस्ते खचले आहेत. या रस्त्यांवरून ये-जा करणे मुश्कील बनले आहे. परिसरातील ड्रेनेज वाहिन्या देखील खराब झाल्या आहेत. या वसाहतींमध्ये गटारीचे बांधकाम करण्यात आले नाही. पूर्णपणे दुर्लक्षित वसाहत म्हणून ओळखली जाते. या परिसरातील रस्त्यांचा विकास करण्यात यावा अशी मागणी रहिवासी करीत आहेत.









