कसबा बीड / विश्वनाथ मोरे :
करवीर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये राज्यमार्ग, जिल्हा मार्ग व प्रमुख गावमार्ग अशी रस्त्यांची कामे होत आहेत. त्यामुळे शहराशी जोडले जाणारे रस्ते चांगल्या प्रतीचे होत असल्यामुळे रस्ता सुसाट झाला आहे. पण, काही महिने झाले, या सुसाट रस्त्यावर भटकी कुत्री मोकाट फिरत आहेत. रस्ता सुसाट असल्यामुळे टू व्हीलरवरून प्रवास करणारे नागरिक अचानक कुत्रे आडव्या आल्यामुळे गाडीवरून पडून काही जण जखमी तर काहीजण गंभीर जखमी तर काहीजणांना हात पाय मोडल्यामुळे घरात बसून राहावे लागले आहे.
करवीर तालुक्यातील कसबा बीड पश्चिम भागामध्ये अनेक गावात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे अशा रस्त्यावरून प्रवास करणे सध्या धोक्याचे होत आहे. दहा-बारा कुत्र्यांचा घोळका. त्यामधून दुचाकी गाडी चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातील काही कुत्री दुचाकी गाडीच्या मागे धावत पाठलाग करतात. त्यावेळी भीतीने दुचाकीस्वार गाडीचा वेग वाढवतो, तर कधी दुचाकी स्वारला कुत्रा चावतो अशा घटना वाढत आहेत.
- कचऱ्यांमुळे भटक्या कुत्र्यांच्या झुंडी
घंटागाडीच्या माध्यमातून एकत्रित होणारा कचरा हा प्रत्येक गावाच्या वेशीवर व प्रमुख मार्गावर दिसून येत आहे. प्रत्येक गावातील घंटागाडीच्या माध्यमातून जमा होत असलेला हा कचरा ही प्रत्येक गावची समस्या झाली आहे. तो कचरा गावात येणाऱ्या प्रमुख मार्गावर वेशीजवळ पडल्याने प्रत्येक गावात असणऱ्या भटक्या कुत्र्यांचे हे प्रमुख अन्न झाले आहे. जिथे कचरा पडतो तिथे कुत्री झुंडीने एकत्र येतात. त्यांच्याकडून नागरिकावर अनेकवेळा होतात. त्यामुळे ही गंभीर बाब लक्षात घेता नागरिकांना हातामध्ये काठी किंवा संरक्षक साहित्य घेऊनच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या वरती नियंत्रण करणे या मागणीचा जोर वाढत आहे.
- कायमस्वरूपी तोडगा आवश्यक
या कुत्र्यांना नियंत्रण आणण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे. या समस्येकडे पाहता प्रशासन, ग्रामस्थ व प्राणिमित्र संघटना या सर्वांनी एकमेकांकडे बाजू ढकलण्यापेक्षा एकत्र येऊन सामूहिक जबाबदारीने या समस्येतून मार्ग काढला पाहिजे अन्यथा भविष्यामध्ये मोठा धोका होण्याची शक्यता आहे.
- कुत्र्यामुळे गाडीवरून पडलो
कामावर जात असताना माझ्या गाडीच्या कुत्रे अचानक आडवे आल्यामुळे मी गाडीवरून पडलो. डोके, हाता पायासह डोळ्याजवळ इजा झाली. हाता पायाला लागल्यामुळे मला 20 ते 25 दिवस घरात राहावे लागले .प्रशासनाने या बाबीचा गांभीर्यपूर्वक विचार करून मार्ग काढावा.
-उदयसिंग पाटील, कोगे.
- भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी निर्बीजीकरण व लसीकरण मोहीम राबविण्यात आली पाहिजे. गावोगावी होणाऱ्या या कुत्र्यांच्यामुळे अपघात ही प्रमुख समस्या झाली आहे, यासाठी प्रशासन व प्राणी मित्र तसेच ग्रामस्थांनी एकत्र येऊन यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे.
– सचिन पाटील, कोगे सामाजिक कार्यकर्ते








