ग्रामस्थांच्या मागणीनंतर ग्रामपंचायतीने त्वरित केला पाठपुरावा
वार्ताहर/उचगाव
कोनेवाडी येथील शेतवडीत राहत्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याची आणि पथदीपाची काही ग्रामस्थांनी मागणी केली होती. उचगाव ग्रामपंचायत उपाध्यक्षांनी त्याची दखल घेऊन तातडीने गावाला भेट देऊन सदर रस्ता आणि पथदीपासंदर्भात चर्चा केली. या दोन्ही मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. कार्यतत्परता आणि दखल घेतल्यासंदर्भात ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. उचगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामधील कोनेवाडी गावाच्या नवीन वसाहत भागात काही घरे झाली आहेत. पावसाळ्यात सदर रस्ता चिखलाने माखल्याने या रस्त्यावरून ये-जा करणे कठीण झाले आहे.
मात्र काही शेतकऱ्यांनी या रस्त्यासंदर्भात आपली जागा देण्यास नकार दिल्याने तक्रारीमुळे सदर रस्त्याचे काम खोळंबून असल्याचे सांगण्यात आले. मात्र उचगाव ग्रा. पं. उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे यांनी मध्यस्थी करून या भागात ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांची कुचंबणा थांबविण्यासाठी म्हणून सध्या तात्पुरता रस्ता करून देण्याचे ठरविले. तातडीने ठेकेदारांना बोलावून सदर काम त्वरित सुरू करावे, असे सांगण्यात आले. तसेच पथदीपासंदर्भातही कॉन्ट्रॅक्टरना बोलावून तातडीने वायर ओढून या ठिकाणी त्वरित सोय करावी, असा आदेश दिल्याने ग्रामस्थांमधून या संदर्भात उचगाव ग्रामपंचायत अध्यक्षा, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांचे कोनेवाडी गावातील नागरिकांतून आभार व्यक्त करण्यात येत आहेत. यावेळी उचगाव ग्रा. पं. अध्यक्षा मथुरा तेरसे, उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, कोनेवाडी गावचे ग्रा. पं. सदस्य मोनाप्पा पाटील, गजानन नाईक तसेच कॉन्ट्रॅक्टर मधू चोपडे, हुंदरे यावेळी उपस्थित होते.









