बेळगाव-खानापूर आगारप्रमुखांच्या प्रतिनिधींची आंदोलनस्थळी भेट : आश्वासनानंतर रास्ता रोको मागे
खानापूर : गर्लगुंजी-बेळगाव-गर्लगुंजी आणि खानापूर-गर्लगुंजी या शटल बससेवेच्या मार्गात बदल केल्याने गर्लगुंजी येथील विद्यार्थी, व्यावसायिक, कामगार आणि नागरिकांची गैरसोय होत होती. याबाबत बेळगाव आणि खानापूर बस आगारप्रमुखांना विनंती करूनदेखील शटल बससेवेचा मार्ग बदलण्यात न आल्याने गर्लगुंजी ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी मंगळवारी सकाळी 9.30 ते 12 पर्यंत रास्ता रोको केल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शेवटी बेळगाव आणि खानापूर आगारप्रमुखांच्या प्रतिनिधींनी आंदोलनस्थळी भेट देऊन पुन्हा जुन्या मार्गानुसार शटल बस सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.
गर्लगुंजी येथील ग्रामस्थ, ग्रा. पं. सदस्य, विद्यार्थ्यांनी गेल्या दोन महिन्यांपूर्वी आंदोलन करून गर्लगुंजी ते बेळगाव आणि गर्लगुंजी ते खानापूर अशी बससेवा सुरू करून घेतली होती. मात्र अलीकडेच खासदार जगदीश शेट्टर यांनी सूचना केल्यानुसार बेळगावहून येणाऱ्या बसेस नंदिहळ्ळी गावातून गर्लगुंजीमार्गे जात होत्या. तर खानापूर आगारातून येणाऱ्या बसबाबत आमदार विठ्ठल हलगेकर यांनी पत्र दिल्याने ही बस तोपिनकट्टीमार्गे गर्लगुंजी येथे येत होती. त्यामुळे दोन्ही बसमध्ये गर्लगुंजीवासियांना जागाच मिळत नव्हती. तसेच या बसेस गर्लगुंजीच्या बसथांब्यावर न थांबता बाहेरच्या बाहेर जात असल्याने बेळगाव आणि खानापूर येथे उद्योग व्यवसायासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचता येत नव्हते. त्यामुळे नागरिकांना राजहंसगड क्रॉस किंवा गर्लगुंजी शेवटचा थांबा या ठिकाणी जाऊन ताटकळत उभे रहावे लागत आहे. मात्र तोपिनकट्टी आणि नंदिहळळीहून येणाऱ्या बस पूर्णपणे भरून येत असल्याने गर्लगुंजी येथील प्रवाशांना घेण्यात येत नव्हते. त्यामुळे ताटकळत उभे राहून इतर वाहनांनी खानापूर, बेळगाव गाठावे लागत हेते. त्यामुळे विद्यार्थी आणि उद्योग-व्यवसायानिमित्त जाणाऱ्यांना वेळेवर पोहोचता येत नव्हते.
जर नंदिहळ्ळी व तोपिनकट्टीसाठी बस हव्या असतील तर वेगळ्या बस द्याव्यात, मात्र पूर्वीप्रमाणे गर्लगुंजी शटल बससेवा कायम करावी, अशी मागणी करून आंदोलन सुरूच ठेवले. त्यामुळे दोन्ही आगारप्रतिनिधीनी वरिष्ठांशी संपर्क साधून शटल बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, हणमंत मेलगे, अजित पाटील, सुरेश मेलगे, प्रसाद पाटील, मायापा पाखरे, सोमनाथ यरमाळकर, गोकुळ चौगुले, विनोद कुंभार, मारुती पाटील, लक्ष्मण मेलगे, शांताराम मेलगे, सुनील पाटील, पुंडलिक पाटील, अनिल मेलगे, पाटील, श्रेयस निटूरकर, नारायण कोलेकर, बाबुराव मेलगे, कलाप्पा लोहार, चन्नापा मेलगे, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
जवळपास तीन तास वाहतूक ठप्प
बेळगाव आणि खानापूर आगारप्रमुखांना विनंती करूनदेखील शटल बससेवा सुरू करण्यात येत नव्हती. त्यामुळे गर्लगुंजी ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी 9.30 वाजता रास्ता रोको केला. त्यामुळे जवळपास तीन तास या रस्त्यावरून वाहतूक ठप्प झाली होती. याची माहिती खानापूर पोलिसांना मिळताच खानापूर पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेऊन आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले. मात्र ग्रामस्थांनी जोपर्यंत दोन्ही आगारप्रमुख येऊन बससेवा पूर्वीप्रमाणे सुरू करणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असे स्पष्ट केल्याने बेळगाव आणि खानापूर आगार येथील लोकप्रतिनिधी आंदोलनस्थळी येऊन बससेवेतील मार्गात बदल करण्याच्या सूचनेबाबत स्पष्ट केले. मात्र गर्लगुंजीसाठी बससेवा असताना या बस इतर गावांना का, असा सवाल केला.









