14 कोटींचा निधी मंजूर : साडेचार कि.मी. काँक्रीट रस्ता होणार
खानापूर : राजा टाईल्स ते करंबळ क्रॉसपर्यंतच्या शहरांतर्गत जाणाऱ्या महामार्गाच्या विकासासाठी एकात्मिक विकास योजनेतून 14 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या रस्त्याच्या बांधकामास सुरुवात झाली आहे. काम हेस्कॉम कार्यालयापासून नदी पुलापर्यंत सुरू केले आहे. पुढील तीन महिन्यात संपूर्ण साडेचार कि. मी. रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सांगण्यात आले आहे. बेळगाव-गोवा महामार्गाचे काम हाती घेतल्यानंतर शहरातील महामार्गाचे हस्तांतर सार्वजनिक बांधकाम खात्याकडे करण्यात आले होते. मात्र यापूर्वी हा रस्ता महामार्ग प्राधिकरणाकडे होता. त्यामुळे या रस्त्याचा विकास करणे महामार्गाचे काम होते. यासाठी एकात्मिक विकास योजनेतून रस्त्याच्या विकासासाठी केंद्र सरकारने 14 कोटी रुपयाचा निधी मंजूर होता. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे गेल्या 8 वर्षापासून या रस्त्याच्या विकासाचे काम ठप्प झाले होते. महामार्ग प्राधिकरणाने हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हस्तांतर केल्यानंतर या रस्त्याच्या विकासकामाला गती मिळाली होती.
येत्या तीन महिन्यात रस्त्याचे काम पूर्ण करणार
आता या रस्त्याच्या प्रत्यक्ष विकासकामास सुरुवात झाली आहे. या रस्त्याच्या विकासाचे काम गोकाक येथील कागल कंपनीला देण्यात आले आहे. संपूर्ण रस्त्याचे एम. 20 ग्रेडचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. तसेच 10 इंच उंचीचा रस्ता करण्यात येणार आहे. या रस्त्यावर पाणथळ जागेच्या दोन ठिकाणी सीडी उभारण्यात येणार आहे. मात्र लोखंडाच्या सळीचा वापर करण्यात येणार नसल्याने या रस्त्याच्या दर्जाबाबत शंका निर्माण होत आहे. रस्ता सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याएवढाच होणार की, आमदार प्रल्हाद रेमाणी यांच्या कार्यकाळात शहरांतर्गत रुंद केलेल्या आराखड्यानुसार होणार की, पुन्हा रुंदीकरण वाढवणार याबाबत मात्र कोणतीही स्पष्टता नसल्याने सध्या अस्तित्वात असलेला रस्ताच होईल.









