हिंडलगा :
हिंडलगा ग्राम पंचायत क्षेत्रातील बेळगाव-वेंगुर्ला रोडवरील गोकुळनगर येथील ‘तरुण भारत’ कार्यालय ते मुख्य रस्त्यापर्यंत रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ दि. 17 रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आला. या रस्त्यासाठी येथील नागरिकांची कित्येक वर्षांपासूनची मागणी होती. याबाबत वेळोवेळी प्रयत्न होत असताना महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी लागलीच दखल घेऊन आपल्या फंडातून रक्कम मंजूर करून रस्ताकामाचा शुभारंभ कुदळ मारून केला.
येथील रहिवाशांनी व महिलावर्गाने त्यांचे जल्लोषात स्वागत केले. स्थानिक महिलांनी रस्ताकामाचे पूजन केले. ग्राम पंचायत अध्यक्ष मीनाक्षी हित्तलमनी व सदस्या प्रेरणा मिरजकर, सीमा देवकर, उपाध्यक्ष चेतना अगसगेकर, निवृत्त मुख्याध्यापिका अंजना अतवाडकर, बुडाचे माजी अध्यक्ष युवराज कदम यांच्या हस्ते पूजन कार्यक्रम करण्यात आला. ग्रा. पं. सदस्य विठ्ठल शं. देसाई यांनी श्रीफळ वाढविले. यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी या रस्ताकामासाठी फंड मंजूर केला असून उत्तम दर्जाचे काम करण्याबाबत कंत्राटदार माधव बैरागी यांना सूचना केली. तसेच या भागातील रस्ते व गटारी बांधकामासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले.
यावेळी ग्रा. पं. सदस्य प्रवीण पाटील, राहुल उरणकर, अशोक कांबळे, डी. बी. पाटील, गजानन बांदेकर, रामचंद्र कुद्रेमनीकर, एन. एस. पाटील, ग्राम पंचायत कर्मचारी, येथील नागरिक गिरीश हरपनहळ्ळी, बाबासा चौधरी, सुधीर ढेकोळे, रघुनाथ किणेकर, ता. पं. माजी सदस्य गणेश तेलकर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी तरुण भारतचा सर्व परिवार उपस्थित होता. विठ्ठल देसाई यांनी आभार मानले.









