दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू झाल्याने वाहनधारकांतून समाधान
बेळगाव : गोवावेस ते आरपीडीपर्यंतच्या काँक्रिटीकरणाचे काम गेल्या महिन्याभरापासून सुरू होते. अत्यंत संथगतीने काम सुरू असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. मात्र आता ते काम पूर्ण झाले असून दोन्ही बाजूचे रस्ते वाहतुकीसाठी खुले झाल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील रस्त्यांचे काम करण्यात येत आहे. आरपीडी क्रॉस ते गोवावेसच्या रस्त्याच्या कामासाठी काही ठिकाणी खोदाई केली होती. काही ठिकाणी डांबरीकरणही केले होते. मात्र तो रस्ता काही दिवसातच खराब झाला होता. पाईप घालण्यासाठी काही ठिकाणी खोदाईही करण्यात आली होती. त्यानंतर आता गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून कामाला सुरुवात करण्यात आली होती. त्यामुळे दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावरून वाहतूक वळविली होती. एकाच रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आल्यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होत होती. त्यामुळे लहान-मोठे अपघातदेखील घडत होते. पण आता रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने दोन्ही रस्त्यावरून वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.









