खानापूर / प्रतिनिधी
खानापूर-अनमोड व्हाया हेम्माडगा या रस्त्यावरून गोव्याला जाणारी अवजड व इतर वाहतूक गेल्या चार वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात होत असल्याने हा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. यामुळे या भागातील 50 खेडय़ांतील जनतेचे मोठे हाल होत आहे. याबाबत अनेक वेळा अर्ज-विनंत्या करूनही संबंधित खात्याने कोणतीच दखल घेतली नाहे. यासाठी हा रस्ता 27 ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी सुरळीत न केल्यास 29 रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार प्रवीण जैन, पोलीस निरीक्षक सुरेश शिंगी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता हलगी यांना देण्यात आले.
बेळगाव -रामनगर रस्ता नव्याने करण्यासाठी वाहतुकीस बंद केला होता. यामुळे गोव्याला जाणारी वाहतूक खानापूर-हेम्माडगा-अनमोड मार्गे चार वर्षांपासून सुरू आहे. हा रस्ता अरुंद तसेच जंगलातून जात असल्यामुळे हलक्या वाहतुकीसाठी करण्यात आला होता. मात्र, रामनगर रस्त्याचे काम न्यायालयीन स्थगितीमुळे गेली चार वर्षे रखडले गेले. त्यामुळे गोव्याला जाणारी अवजड वाहतूक या रस्त्यावरून होत होती. त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे उखडून गेला असून या भागातील पन्नास गावांना रस्ताच नाहीसा झाला आहे. या रस्त्यावरून साधी दुचाकीही चालविणे कठीण झाले आहे. वारंवार छोटय़ा-मोठय़ा अपघातांची मालिका सुरूच आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याला विनंती करूनही कोणतीच दखल घेतली नसल्याने हा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.
सध्या या भागातून पन्नास गावांना संपर्कासाठी दुसरा रस्ता नसल्याने नाईलाजाने लोक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. यासाठी ता. पं. माजी सदस्य बाळाराम शेलार, ग्रा. पं. सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर, प्रकाश चव्हाण, यशवंत बिरजे, पंचायत सदस्य मऱयाप्पा पाटील, नाना घाडी, गणपत गुरव, आबासाहेब दळवी, वसंत पाटील, जी. एन. गुरव, बाबू कुम्रतवाडकर यासह अन्य नागरिक उपस्थित होते.
प्रतिक्रिया
बेळगाव-रामनगर रस्ता न्यायालयीन स्थगितीमुळे बंद आहे. त्यामुळे खानापूर-अनमोड व्हाया हेम्माडगा रस्त्यावरून चार वर्षांपासून अवजड वाहतूक होत असल्यामुळे हा रस्ता उद्ध्वस्त झाला आहे. येथून होणारी अवजड वाहतूक थांबवावी, अशी मागणी यापूर्वी करण्यात आली होती. मात्र, याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे हा रस्ता उद्ध्वस्त झाला आहे. या रस्त्यावरील वाहतूक सायंकाळी 6 नंतर बंद करण्यात येते. मात्र येथून रात्रंदिवस वाहतूक होत असल्याने कायद्याचेही उल्लंघन होत आहे. यासाठी या रस्त्यावरून होणारी अवजड वाहतूक तात्काळ थांबविण्यात यावी, तसेच हा रस्ता येत्या आठ दिवसात वाहतुकीस योग्य न केल्यास रास्ता रोकोचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
-बाळाराम शेलार









