वाहतूक खात्यातर्फे जन जागृती मोहीम
पणजी : वाहन चालकांची सुरक्षा फार महत्वाची आहे. त्यामुळे वाहतूक खाते वाहन चालकांना केवळ दंड देणे इतकेच काम करीत नाही तर वाहतूक नियमांबाबत जनजागृती करणे आणि वाहन चालकांना वाहतूक नियमांबाबत जागृत करण्याचे काम करीत आहे. त्यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताह पाळला जातो. रस्ता सुरक्षा सप्ताच्या गेल्या चार दिवसात 100 हुन अधिक वाहन चालकांना दंड ठोठावला. परंतु या सप्ताहात वाहन चालकांना दंड देणे आमचा उद्देश नसून त्यांना जागृत करणे कर्तव्य असल्याची माहिती असे वाहतूक खात्याचे सहाय्यक संचालक सेड्रिक सौझा कार्देरो यांनी दिली. वाहतूक खात्यातर्फे येथील मेरशी जक्शन जवळ जनजागृती मोहीमप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत इतर अधिकारीही उपस्थित होते. अनेक दुचाकी चालक हलक्या दर्जाच्या हेल्मेटचा वापर करतात. त्यामुळे एखाद्यावेळी अपघात झाल्यास त्यांच्य जीवाला धोका असतो. हेल्मटचा वापर करताना ते हेल्मेट कसे असावे या बाबत जागृती करण्यात आली. काही दुचाकी चालकांना वाहतूक खात्यातर्फे हेल्मेट देण्यात आली. अशा प्रकारचा कार्यक्रम उत्तर गोव्यात दहा ठिकाणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पणजी शहरात अनेक ठिकाणी बेशिस्त पार्किंग केले जाते. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असते असे विचारले असता, पोलीस खात्याच्या वाहतूक विभागाला बेशिस्त पार्किंग केलेली वाहने उचलण्यासाठी विशेष वाहन दिले जाईल तसेच पणजी शहराचा नवा आराखडा तयार करून पणजी शहरात वाहने जाणार नाही यासाठी सीटीबसचा वापर करण्याच्या प्रयत्नात असल्याचेही ते म्हणाले. अनेक ठिकाणी मालवाहक ट्रक उभे केले जातात्। त्याचा त्रास इतर वाहन चालकांना होत असतो. त्याबाबत तक्रारीही आमच्याकडे आल्या आहेत याच्यावर तोडगा म्हणून ट्रक टर्मीनल उभारून त्याठिकाणी ट्रक पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. याबाबत काम सुऊ असल्याचेही ते म्हणाले. राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसून ते पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावले जातील. यावेळी वाहतूक खात्याचे अधिकारी वाहन चालकांना अडवून त्यांना वाहतूक नियमांबाबत माहिती दिली. अनेक दुचाकीस्वरांना दर्जेदार हेल्मेट मोफत देण्यात आली.









