कुडाळ SRM कॉलेजात रस्ता सुरक्षाआणि वाहतूक नियम मार्गदर्शन शिबिर संपन्न
वार्ताहर / कुडाळ
रस्ता सुरक्षाबाबत प्रबोधन करणे काळाची गरज आहे. वाहन चालविताना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पोलिस हे आपले मित्र असून काही समस्या असल्यास त्यांना सांगा ते आपल्याला निश्चितच सहकार्य करतील, असे प्रतिपादन नाईक मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक श्रीनिवास नाईक यांनी येथे केले.वाहन चालविताना मोबाईल फोन वापरू नये. नाही, तर तो यमाचा कॉल होऊ शकतो. मोबाईलचा वापर गाडी थांबवूनच करावा असे आवानही त्यांनी केले.
लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदूर्ग या सेवाभावी संस्थेच्या सेवा सप्ताह निमित्त रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत येथील संत राऊळ महाराज महाविद्याल येथे विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियम विषयी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी प्राचार्य डॉ. व्ही. बी. झोडगे, लायन्स अध्यक्ष जयंती कुलकर्णी, सीए सुनील सौदागर, सचिव स्नेहा नाईक, डॉ. दिपाली काजरेकर, अँड समीर कुळकर्णी, डॉ. सुशांता कुळकर्णी, प्रा. एस. टी. आवटे, प्रा. शरयू आसोलकर, लायन्स पदाधिकारी व विद्यार्थी आदी उपस्थित होते.
नाईक म्हणाले, भारतात दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक अपघातात मरतात. तर हजारोच्या संख्येने जखमी होतात. अपघातात होणारी जीवित हानी व वित्तहानी ही कुठल्याही महामारी व युध्दापेक्षा मोठी असते. आज 80% अपघात हे माणसाच्या चुकीमुळे होतात. यांत्रिक चुकांमुळे अपघात फार कमी होतात. अपघाताबाबत आपण कोणतेही वाहतूक नियम पाळत नाही. आपल्याला चिन्हांची माहिती नसते. अतिउत्साह ,जबाबदारीचे भान नसणे, चुकीच्या गोष्टीचा पाठपुरावा करणे यागोष्टी अपघातास कारणीभूत ठरतात. गाडी चालविणे आणि कशी चालविणे यात खूप फरक आहे. वाहन चालविताना संयम सौजन्य, सावधानता, सतर्कता हे फार महत्वाचे आहे. युवा पिढीने धूम स्टाईलने गाडी चालविण्याला तात्काळ फुलस्टॉप द्यावा, नाहीतर आपल्या आयुष्याचा फुलस्टॉप होईल, असेही त्यांनी सांगितले.वाहन चालविताना हेल्मेट, एल्बो पॅड आदी गोष्टी सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाच्या असतात. नुसती गाडी चालविता येणे महत्त्वाचे नाही, तर त्यासोबत लागणारी कागदपत्रे, इन्शुरन्स या विषयांवर नाईक यांनी मार्गदर्शन केले.स्नेहा नाईक यांनी मुलांनी विज्ञान सोबत देवाचे स्मरण व मोठ्यांना नमस्कार करूनच घरातून बाहेर पडावे. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड असणे महत्त्वाचे आहे, असे सांगितले.









