बेळगाव : गोगटे चौकातील रस्ता ठिकठिकाणी खराब झाला आहे. तसेच काँक्रिटीकरण करताना व्यवस्थित जोडणी झाली नसल्याने रस्त्यामध्ये निर्माण झालेल्या चरी अपघातास कारणीभूत ठरत आहेत. याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांना जाग आली आहे. सदर रस्त्यावर पेव्हर्स घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
गोगटे चौकासह विविध चौकात रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. काँक्रिटीकरण एकाचवेळी करण्यात आले नसल्याने फटी निर्माण झाल्या आहेत. या निर्माण झालेल्या दोन रस्त्यांच्या फटीमध्ये दुचाकी वाहनांचा टायर जाऊन वाहने घसरण्याचे प्रकार घडत आहेत. रस्त्यामध्ये निर्माण झालेल्या या फटी बुजविण्यात याव्यात, अशी मागणी केली होती. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांनी गणेशोत्सवापूर्वी हे काम सुरू केले होते. मात्र खरेदीसाठी बाजारपेठेत येणाऱया नागरिकांची गैरसोय होण्याची शक्मयता होती. परिणामी हे काम थांबविण्यात आले होते.
आता सोमवारपासून गोगटे चौकातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी पेव्हर्स घालण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. आता तरी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांनी रस्त्याचे काम व्यवस्थित करावे, अशी मागणी होत आहे.









