हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कामाला जोरदार प्रारंभ
बेळगाव : अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सांबरा ते शहरापर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाला प्रारंभ करण्यात आला आहे. बसवण कुडची परिसरात रस्ता खराब झाला होता. आता त्याचे डांबरीकरणच करण्यात येत आहे. या रस्त्यावरून आमदार, मंत्री आता ये-जा करणार आहेत. त्यामुळे हा रस्ता करण्यात येत आहे. मात्र येथील जनतेची काही तरी काळजी आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मंत्री किंवा महनीय व्यक्ती आल्यानंतरच रस्ते केले जाणार आहेत का? देशातील सर्वसामान्य जनतेला काहीच किंमत नाही का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे आता शहरातील तसेच इतर परिसरातील रस्ते दुरुस्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून सूचना केल्या आहेत. याचबरोबर मनपा आयुक्त यांनीही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केली आहे. त्यामुळे आता या रस्त्याला सुरुवात झाली आहे. अधिवेशन असल्यामुळे हे रस्ते होत आहेत. अन्यथा या रस्त्यांकडे दुर्लक्ष झाले होते. सांबरा ते न्यू गांधीनगरपर्यंत रस्त्याचे काम केले जात आहे. मात्र ते अत्यंत संथगतीने सुरू होते. मात्र आता अधिवेशनामुळे त्याला गती देण्यात आली आहे. सध्या सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. बेळगाव-बागलकोट रस्त्याचे चौपदरीकरण होणार आहे. मात्र या कामाला म्हणावा तसा वेग दिला नसल्याचे दिसून येत आहे. मात्र आता किमान सांबरा ते न्यू गांधीनगरपर्यंतचा रस्ता तरी चकाकणार आहे.









