अतिवाड फाटा-महाराष्ट्र हद्दीपर्यंत रस्त्याची दुर्दशा
बेळगाव : उचगाव-कोवाड मार्गावरील अतिवाड फाटा ते महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या एक किलोमीटर रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे बॉर्डरवरील रस्ता आणि वाहनधारकांना खस्ता, असा संताप वाहनधारकांतून व्यक्त होत आहे. पावसामुळे सर्वत्र डबकी निर्माण झाली आहेत. वाहनधारकांना धक्के खात मार्ग काढावा लागत आहे. लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाल्याने वाहनधारकांची कसरत सुरू झाली आहे. कर्नाटक-महाराष्ट्र दोन्ही राज्यांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. यामुळे या मार्गावर वाहनधारकांची संख्यादेखील मोठी आहे. मात्र, कर्नाटक हद्दीतील एक किलोमीटर रस्त्याची दुर्दशा झाल्याने वाहनधारकांना अडचणी येऊ लागल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी बसुर्ते क्रॉस ते अतिवाड फाट्यापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र, केवळ एक किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांतून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. सध्या पावसामुळे रस्त्यावर डबकी निर्माण होऊन चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. वाहने घसरून अपघात होऊ लागले आहेत. याबाबत लोकप्रतिनिधींकडे तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष झाले आहे. या मार्गावर कोवाड, आजरा, नेसरी, गडहिंग्लज यासह होसूर, अतिवाड, बेकिनकेरे गावातील वाहनधारकांची ये-जा अधिक आहे. मात्र, रस्ता वाहतुकीस कुचकामी ठरू लागला आहे. त्यामुळे वाहनधारकांना सीमाभागातील रस्ता नकोसा होऊ लागला आहे.