दोन दशकांनंतर नेमणुकीचा पुन्हा विचार : 2900 जणांच्या नेमणुकीसाठी प्रयत्न
प्रतिनिधी/ बेळगाव
रस्त्यांची देखभाल व सुरक्षिततेच्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम खाते पुन्हा एकदा मैलकुलींची नेमणूक करणार आहे. यासाठी खात्याने वित्त खात्याला प्रस्ताव सादर केला आहे. मैलकुलींच्या नेमणुकीमुळे रस्त्यांवर अतिक्रमण व इतर अनधिकृत कामांना पायबंद होणार आहे.
राज्यात जिल्हा, तालुका रस्ते, राज्य महामार्गांच्या देखभालीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे प्रति 30 किलोमीटरला एक याप्रमाणे 2900 मैलकुली कंत्राट पद्धतीने नेमणूक करण्यासाठी वित्त खात्याला प्रस्ताव सादर झाला आहे. मात्र, प्रशासकीय, आर्थिक, तांत्रिक यासह विविध कारणांनी या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नसल्याने नेमणुका उशिराने झाल्या आहेत.
23 वर्षांपासून नेमणुका नाहीत
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माहितीनुसार 1950 पासून रस्त्यांच्या सुरक्षिततेसाठी मैलकुलींची नेमणूक करण्याची पद्धत अस्तित्वात आहे. आता या योजनेतील बहुतांशी कामगार निवृत्त झाले आहेत. 2002 नंतर नव्याने मैलकुली नेमणुकीची प्रक्रिया झालेलीच नाही. त्यामुळे रस्त्यावर अतिक्रमण, अनधिकृत कामे, रस्त्याच्या कडेने झाडेझुडुपे यांचा उपद्रव वाहनचालकांना होत होता. त्याशिवाय रस्ते दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण होत नव्हती. परिणामी अपघातांचे प्रमाणही वाढले होते. यावर उपाय म्हणून मैलकुलींची नेमणूक करण्यासाठी सरकारकडे मागणी करण्यात आली होती.
प्रायोगिकरीत्या 1500 जणांची नेमणूक
2024-25 मध्ये प्रायोगिक तत्त्वावर कंत्राट पद्धतीने 1 हजार 500 मैलकुलींची नेमणूक करण्यात आली आहे. हे सर्व मैलकुली कंत्राटदारांच्या नेतृत्वात कार्य करीत आहेत. कंत्राटदारांच्या सूचनेनुसारच त्यांची कामे सुरू आहेत. या मैलकुलींचे नेतृत्व सार्वजनिक बांधकाम खात्याकडून व्हावे, नियमानुसार नेमणुकी झाल्या तरच रस्त्यांची देखभाल व्यवस्थित होणार आहे, असे अर्थ खात्याने स्पष्ट केले आहे. मात्र, आतापर्यंत यावर कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त झालेली नाही.









