लोकप्रतिनिधीनी लक्ष घालण्याची मागणी : रस्त्याची त्वरित दुरुस्तीची गरज
वार्ताहर/उचगाव
उचगाव-कोवाड मार्गावरील अतिवाड क्रॉस ते कर्नाटक महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या एक किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अक्षरश: दुर्दशा झाली असून संपूर्ण रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांनी हा रस्ता विखुरल्याने या रस्त्याची चाळण झाली आहे. सदर रस्त्याची तातडीने दुऊस्ती करावी, अशी मागणी या भागातील प्रवासी आणि नागरिकांनी केली आहे. उचगाव-कोवाड हा महामार्ग कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांचा महत्त्वाचा रस्ता आहे. बेळगाव तसेच शिनोळी, बेळगुंदी, उचगाव अशा अनेक भागातील प्रवासी आणि नागरिकांची महाराष्ट्र हद्दीतील कागणी, कोवाड ते थेट नेसरी, आजरा, गडहिंग्लज, कोल्हापूर अशा भागात सातत्याने या रस्त्यावरून ये-जा होत असते. उचगाव ते अतिवाड क्रॉसपर्यंतचा रस्ता कर्नाटक शासनाने डांबरीकरणाचे काम पूर्ण केले आहे. तसेच कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीपासून महाराष्ट्रात जाणारा गडहिंग्लजपर्यंतचा संपूर्ण रस्ता हा अतिशय चांगल्या प्रतीचा आहे. मात्र अतिवाड क्रॉस ते कर्नाटक महाराष्ट्र हद्दीपर्यंतचा अवघ्या एक किलोमीटर अंतराच्या रस्त्याचीच दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावर अनेक खड्डे असल्याने यातून रस्ता शोधण्याची वेळ प्रवासीवर्गावर आली आहे. सध्या झालेल्या वळीव पावसामुळे या रस्त्यावरील खड्ड्यांतून पाणी साचून याचा नाहक त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. रात्रीच्या अंधारातून वाहन चालवणे म्हणजे जीवावर बेतण्याचेच प्रसंग प्रवासी वर्गावर असतात.









