रस्ता दुरुस्ती काम पूर्ण केल्याने शेतकरी वर्गातून समाधान
उचगाव : उचगावमधील एनवाड व तांबाळ या शेतवडीतील ये-जा करण्यासाठी असलेल्या रस्त्याची दुर्दशा झाली होती. सदर रस्ता शेतकरी वर्गाला ये-जा करण्यासाठी श्रमदानातून रविवारी पूर्ण केल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शेतवडीत उन्हाळा, पावसाळा ये-जा करण्यासाठी महत्त्वाचा रस्ता आहे. सदर रस्ता पावसाळ्यापूर्वी करण्यात आला होता. मात्र करण्यात आलेला सदर रस्ता पावसाळ्यामध्ये खराब झाल्याने या रस्त्यावरून शेतकऱ्यांना ये-जा करणे कठीण झालेले होते. याची दखल घेऊन एनवाड शिवारातील शेतकऱ्यांनी रविवारी हा संपूर्ण रस्ता श्रमदानाने दुरुस्त केला. या रस्त्यावरती पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने मोठमोठे खड्डे पडलेले होते.
त्यामुळे या रस्त्यावरून वाहनांना किंवा शेतकऱ्यांना ये-जा करणे कठीण जात होते. काही दिवसांमध्ये या परिसरातील भात कापणी जवळजवळ आली असल्याने त्यावेळी या रस्त्यावरून वाहनांना व शेतकऱ्यांना ये-जा करणे कठीण जाणार होते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी रविवारी सकाळी एकत्र येऊन तीन ट्रॅक्टरद्वारे हा संपूर्ण रस्ता दुरुस्त करण्यात आला. उचगाव ग्रा.पं. सदस्य एल. डी. चौगुले यांनी पुढाकार घेऊन हा संपूर्ण रस्ता शेतकऱ्यांच्या मदतीने दुरुस्त करून घेतला. यावेळी अतुल पावशे, महेश हुक्केरीकर, प्रदीप हुकेरीकर, मारुती खांडेकर, शंकर पावले, दत्ता चौगुले, रामभाऊ पावशे, मनोहर होनगेकर आदिंनी ट्रॅक्टरद्वारे हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी परिश्रम घेतले. हा संपूर्ण रस्ता दुरुस्त केल्यामुळे शेतकऱ्यांत समाधान पसरलेले आहे.









