माती खचल्याने अपघात वाढले
प्रतिनिधी/ बेळगाव
कसाई गल्ली येथे काही दिवसांपूर्वी रस्त्यामध्ये खोदाई करण्यात आली होती. परंतु खोदाईनंतर तात्पुरत्या स्वरूपात माती टाकून डागडुजी करण्यात आली. टाकलेली माती खचली असून या ठिकाणी मोठी चर पडली आहे. रात्रीच्यावेळी निदर्शन न आल्याने वाहनधारकांचे अपघात होत आहेत. सध्या शहरात सर्वत्र जलवाहिन्या, ड्रेनेज वाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वत्र खोदकाम सुरू आहे. परंतु खोदकाम झाल्यानंतर ती जागा योग्यप्रकारे बुजविली जात नसल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर उमठत आहे. बऱ्याच ठिकाणी ख•s व चरी पडल्या असून, यामध्ये पडून अनेकजण जायबंदी होत आहेत.
वाहने अडकल्यास मोठा धोका
शहराच्या मध्यवर्ती भागातील कसाई गल्ली येथे काही दिवसांपूर्वी जलवाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात आली होती. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात माती घालण्यात आली खरी. परंतु, ती पहिल्याच पावसात खचली. त्यामुळे रस्त्यापासून फुटभर खाली माती साचली आहे. दुचाकी अथवा चारचाकी वाहन या ठिकाणी अडकल्यास मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
रस्ता खोदाईमुळे व्यापार मंदावला
कसाई गल्ली येथे मासे, चिकन, मटण यांची विक्री होत असल्यामुळे नागरिकांची ये-जा सुरू असते. परंतु रस्त्याच्या खोदाईमुळे व्यापार कमी झाल्याची तक्रार स्थानिक व्यापाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे लवकरात लवकर रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी केली जात आहे.









