बेळगाव : रहदारी पोलीस आणि महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून शहरातील व्यापाऱ्यांना व फेरीवाल्यांना शिस्त लावण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. गुरुवारी शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासमोरील अतिक्रमण हटविण्यासह हातगाड्या हटविण्यात आल्या. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. शहर व उपनगरातील रस्ते अतिक्रमणामुळे निमुळते झाले आहेत. याचा फटका वाहतुकीला बसत असून अनेक ठिकाणी वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे याचा फटका वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.
त्याचबरोबर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गणपत गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली, नरगुंदकर भावे चौक, रविवार पेठ, कांदा मार्केट, पांगुळ गल्ली, भेंडीबाजार आदी ठिकाणचे रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात पोलीस व मनपाला यश आले आहे. सततच्या कारवाईमुळे बैठे विक्रेते व फेरीवाले पांढऱ्या पट्ट्याच्या आत बसून व्यवसाय करताना दिसत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना ये-जा करण्यास अनुकूल झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कारवाईत सातत्य ठेवण्यात आले असल्याने रस्ते अतिक्रमणमुक्त झाले आहेत. बाजारपेठेनंतर आता उपनगरातील अतिक्रमण हटविण्यासाठी अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. गुरुवारी शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासमोर पदपथावर थाटलेले विविध प्रकारचे हातगाडे हटविण्यात आले. तसेच दुकानाबाहेर घालण्यात आलेला जंप देखील पोलीस व मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाने ताब्यात घेतले.









