विटा / सचिन भादुले :
विटा शहरातून विजापूर-गुहागर आणि सांगली-भिगवण हे दोन राष्ट्रीय महामार्ग जात आहेत. हे दोन्ही महामार्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकमेकांना येऊन मिळतात. येथून चारही दिशेला रस्त्यावर शहराच्या हद्दीत डिव्हायडर (रस्ते दुभाजक) बसवण्यात आले आहेत मात्र राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला होणाऱ्या बेशिस्त पार्किंगमुळे हेच डिव्हायडर अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत.
रस्ते आणि महामार्ग याबाबत बिटा शहर मध्यवर्ती केंद्रबिंदू होऊ पाहत आहे. विटा शहरातून विजापूर-गुहागर, सांगली-भिगवण, बिटा-महाबळेश्वर, विटा-मलकापूर, असे राज्य मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग जोडले जात आहेत. या सर्व रस्त्यांची कामे चांगली झाल्यामुळे विटा शहर मध्यवर्ती केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे.
अनेक शासकीय कार्यालयांचे उपविभाग विट्यात असल्यामुळे शहरातील वाहतूक साहजिकच वाढती आहे. अशातच बिजापूर-गुहागर आणि सांगली-भिगवन या दोन्हीही महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौकातून चारही दिशेला रस्ते दुभाजक अर्थात डिव्हायडर बसविण्यात आले आहेत.
वाहतुकीला शिस्त लागावी आणि दोन्ही मार्गाने होणारी वाहतूक सुरळीत व्हावी, या दृष्टीने शहरातून रस्ते दुभाजक बसविण्यात आले. याचा नागरिकांना फायदा होणे ऐवजी तोटाच जास्त होत असल्याचे जाणवत आहे.

या चारही बाजूला जाणाऱ्या दुभाजकांच्या बरती असणारे सिग्नल आता कोलमडून पडले आहेत. सिग्नलच दिसत नसल्यामुळे रात्रीच्या वेळी मोकळ्या रस्त्यावरून भरधाव येणारी वाहने थेट जाऊन दुभाजकाला धडकतात. परिणामी रात्रीच्या अंधारात दुभाजक अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत.
तर दिवसा उजेडी या चारही दिशेच्या महामार्गावरती रस्त्याच्या दोन्ही बाजूला बेशिस्त पार्किंग झालेले आढळून येते. परिणामी हे मोठे मोठे महामार्ग छोट्या गल्लीतील रस्त्याइतपत लहान होऊन जातात. अशा महामार्गावर असणारे दुभाजक पुन्हा अपघाताला निमंत्रण देणारेच ठरले नाहीत तर आश्चर्य वाटेल.
शहरातील रस्ते प्रशस्त आहेत मात्र बेशिस्त पार्किंग आणि डिव्हायडर या दोन्हीमुळे या रस्त्यांची रुंदी कमी होऊन वाहतुकीची कोंडी वारंवार झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशावेळी शहरातून अवजड किंवा मोठी वाहने आली, तसेच उसाचे ट्रॅक्टर ट्रक बळवणे सहज शक्य होत नाही.
परिणामी अवजड वाहने शहरात आल्यास वाहतूक चक्काजाम होऊन बराच काळ ताटकळत उभा राहावे लागते. याबर ठोस उपाय करण्याची गरज वाहनधारकातून व्यक्त होत आहे.








