बाची ते महाराष्ट्र हद्दीपर्यंत अर्धा किलोमीटरच्या रस्त्याची अक्षरशः दुर्दशा : दुरुस्तीकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर स्मार्ट बनविण्यासाठी 1 हजार कोटीचा निधी केंद्र आणि राज्य शासनाने खर्ची घातला आहे. पण शहराला जोडणाऱया बेळगाव-वेंगुर्ला राज्यमार्गाची दुरवस्था झाली असून, कर्नाटक हद्दीत प्रवेश करताच खड्डय़ांचा सामना करावा लागत आहे. बाची ते महाराष्ट्र हद्दीपर्यंत अर्धा किलोमीटरच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे दररोज अपघात घडत आहेत.
महाराष्ट्र आणि कर्नाटक हद्दीवर असलेला बाची गावाजवळील रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात असते. महाराष्ट्र आणि गोवा अशा दोन्ही राज्यातून ये-जा करणाऱया वाहनधारकांना हा रस्ता सोयीचा आहे. त्यामुळे अवजड वाहनांसह बस वाहतूक आणि पश्चिम भागाच्या गावातील वाहनधारक बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याने बेळगाव शहरात ये-जा करीत असतात. पण प्रत्येक पावसाळय़ात बाचीजवळील हा रस्ता पूर्णपणे खराब होतो. दरवषी पावसाळय़ाच्या सुरुवातीस या रस्त्याची दुरवस्था होते. बेळगाव – वेंगुर्ला रस्त्याचा विकास करण्यात आला आहे. पण बाची ते महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या रस्त्याच्या विकासाकडे कर्नाटक शासनाने कानाडोळा केला आहे. त्यामुळे दरवषी पावसाळय़ात या रस्त्याची चाळण होते.
रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी
15 दिवसापासून सुरू झालेल्या पावसात यावषी देखील रस्त्याची दैनावस्था झाली आहे. याठिकाणी यापूर्वी लहान लहान खड्डे होते. सदर खड्डे बुजवले असता ही अवस्था झाली नसती. पण खड्डे बुजवण्याची तसदी सार्वजनिक बांधकाम खात्याने घेतली नाही. त्यामुळे याचा फटका प्रत्येक वाहनधारकाला बसत आहे. पावसाळय़ात पश्चिम घाटातील निसर्गरम्य सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी तसेच आंबोली येथील धबधब्याचा आनंद घेण्यासाठी असंख्य पर्यटक बेळगाव-वेंगुर्ला मार्गाने आंबोलीला जातात. त्यामुळे सध्या या मार्गावर दररोज शेकडो दुचाकी वाहनधारक ये-जा करीत आहेत. पण रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या खड्डय़ातून मार्ग काढताना दुचाकी वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकविण्याचा प्रयत्न वाहनधारक करीत असल्याने अपघात घडत आहेत. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.









