स्मार्ट सिटी प्रशासनाने समस्येकडे लक्ष देण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
राणी चन्नम्मानगर पहिला स्टेज येथील पेव्हर्सचा रस्ता वर्षभरातच खचला आहे. यामुळे वाहनांची ये-जा करताना अनेक अपघात होत आहेत. स्मार्ट सिटी व पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे रस्त्याची ही अवस्था झाली आहे. एखादा मोठा अपघात होण्यापूर्वी स्मार्ट सिटी प्रशासनाने या समस्येकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी होत आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत चन्नम्मानगर येथील अंतर्गत रस्ते पेव्हर्सने करण्यात आले होते. ऑगस्ट 2021 मध्ये पेव्हर्सचा रस्ता करण्यात आला. अवघ्या दोन महिन्यांतच त्या ठिकाणी 24 तास पाण्यासाठी खोदाई करण्यात आली. रस्ता केलेल्या काही महिन्यांतच खोदाई केल्याने नागरिकांमधूनही नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर बरेच दिवस पाईप घालण्याचे काम सुरू होते.
आठ दिवसांपूर्वी खणलेल्या ठिकाणी घिसाडघाई करत पेव्हर्स बसविले. परंतु वाहनांची ये-जा झाल्याने हा रस्ता पूर्णपणे खचला आहे. त्यामध्ये पावसाचे पाणी साचत असून रात्रीच्यावेळी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्मयात आला आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.









