दापोली :
दापोली ते खेड-दस्तुरी या 29 कि.मी. लांबीच्या रस्त्यावर वाकवली येथे 900 मीटरचा सिमेंट काँक्रिटचा रस्ता करण्याचे काम सुरू आहे. त्यात गेले 4 दिवस पाऊस पडत असल्याने हे काम थांबवण्यात आले आहे. शिवाय या रस्त्याच्या अलिकडे टाकलेल्या मातीचा चिखल झाल्याने वाहतुकीवर विपरित परिणाम होऊन नागरिकांना अतोनात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या कामाला किती दिवस लागतील, याचे नियोजन न करता पावसाळ्याच्या तोंडावर काम करायला घेतल्याने वाहनचालकांतून संताप व्यक्त होत आहे.
पाऊस पडायच्या आधी या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटचे काम सुरू होते. मात्र चार दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस सुरू झाल्यावर हे काम पूर्णपणे बंद आहे. शिवाय जेथून सिमेंट काँक्रिटचा रस्ता सुरू होतो, तेथे भरावासाठी माती टाकण्यात आली आहे. धुवाँधार पडलेल्या पावसामुळे या मातीचा चिखल झाला आहे. यामुळे येथे गाड्या फसण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकजण येथे गाडी फसू नये, यासाठी वाकवलीमार्गे खेडला न जाता पालगड ते दस्तुरी असा लांबचा मार्ग पसंत करत आहेत. तर छोट्या गाड्या सुखदर, टेटवलीमार्गे दापोलीत येत आहेत. राज्य परिवहन महामंडळाने लांब पल्ल्याच्या गाड्या येथून न पाठवता पालगड-दस्तुरीमार्गे पाठवायला सुऊवात केली आहे. तर खेडकडे जाणाऱ्या गाड्या वाकवलीच्या अलिकडे थांबवण्यात येत आहेत. तेथून प्रवाशांना वाकवली गावातून पायी चालत जाऊन पुढे खेडची दुसरी गाडी पकडावी लागत आहे. या यातायातीत वयोवृद्ध नागरिक, लहान मुले, महिला यांचे अतोनात हाल होत आहेत.








