सडा गावातील नागरिकांचे हाल : महाराष्ट्र हद्दीतील रस्ता काम थांबवले : वनखात्याचे आडमुठे धोरण

खानापूर : तालुक्यातील पश्चिम भागात असलेल्या पुरातन ऐतिहासिक सडा गावचा संपर्क रस्ता मांगेलीवासियांनी बंद पाडला. या रस्त्यावरून सडावासीय मांगेलीपासून खाली महाराष्ट्रात ये-जा करत होते. मात्र, या कारवाईमुळे डांबरीकरणाचे कामही थांबविण्यात आले.
ऐतिहासिक वारसा लाभलेले सडा हे गाव खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागाचे टोक आहे. येथून महाराष्ट्राची हद्द सुरू होते. सडाच्या बाजूला मांगेली, दोडामार्ग ही गावे लागून आहेत. दोडामार्गचे आमदार दीपक केसरकर यांनी दोडामार्ग ते मांगेली हा रस्ता खडीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी अनुदान मंजूर करून घेतले होते. याचे काम मांगेलीपर्यंत करण्यात आले. मांगेलीपासून सडाला जाणारा रस्ता कर्नाटक हद्दीत येतो. मात्र, कणकुंबी येथील वन कर्मचाऱयांनी आडमुठे धोरण स्वीकारून मांगेली हद्दीत जावून काम बंद पाडण्यासाठी प्रयत्न केले. या रागाने मांगेलीवासियांनी रस्त्याच्या मधोमध मोठी चर मारून हे काम तेथेच थांबविले. महाराष्ट्र हद्दीपासून 1 कि. मी. अंतराचे काम महाराष्ट्र शासनाकडून करून देण्यात येणार होते. मात्र, कणकुंबी येथील वन कर्मचाऱयांनी रस्त्याचे काम बंद पाडल्यामुळे होणारे काम थांबले आहे.सडावासियांना हा रस्ता सोयीचा होता. सडा, मांगेलीचे पूर्वीपासून संबंध आहेत. अनेक व्यवहार, बाजारहाट यासाठी सडा परिसरातील लोक या मार्गाने मांगेलीला जातात. मात्र, शासकीय आडमुठेपणामुळे हा रस्ताच बंद करण्यात आल्याने सडावासियांचे जगणे मुश्कील झाले आहे.
वनरक्षकांनी उत्तर देणे टाळले
याबाबत कणकुंबीचे वनरक्षक मराठे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हा रस्ता आम्ही अडविलेला नाही, असे सांगून उत्तर देणे टाळले. महाराष्ट्र शासनाच्या हद्दीपर्यंत रस्ता झाला असता तर सडावासियांना सोयीचे झाले असते. अजूनही वरिष्ठ पातळीवर चर्चा करून यातून मार्ग काढून हा रस्ता करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.









