कंग्राळी खुर्द ग्रा. पं. सदस्याची कार्यतत्परता : पालकांतून समाधान
कंग्राळी बुद्रुक : कंग्राळी खुर्द ग्राम पंचायत सदस्य राकेश पाटील यांच्या कार्यतत्परतेमुळे वॉर्ड क्रमांक 10 मधील अंगणवाडी चिमुकल्यांसाठी चिपिंग टाकून रस्ता करून दिल्यामुळे अंगणवाडी शिक्षिका व पालकवर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कंग्राळी खुर्द गावातील वॉर्ड क्रमांक 10 मधील अंगणवाडीसमोर चिमुकल्यांना ये-जा करणाऱ्या वाटेवर चिखलाचे साम्राज्य पसरले होते. याचा त्रास अंगणवाडीला येणाऱ्या चिमुकल्यांना होत होता. तेंव्हा अंगणवाडी शिक्षकांनी विभागाच्या ग्राम पंचायत सदस्यांना संपर्क साधून होणारा त्रास सांगितला. याची जाणिव करून देताच ग्रा.पं. सदस्य राकेश पाटील यांनी लागलीच कर्मचाऱ्यांना बोलावून या रस्त्यावर चिपिंग घालून रस्ता निर्माण करून देण्याच्या सूचना केल्या. तातडीने हे काम करण्यात आल्याने अंगणवाडीला ये-जा करणारी चिमुकले व पालकांना याची सोय झाली.
ज्योतीनगर परिसरातील कचऱ्याचीही उचल
कंग्राळी खुर्द ग्रा. पं. हद्दीला लागून असलेल्या महानगरपालिकेच्या व्याप्तीमध्ये येणाऱ्या ज्योतीनगर येथे रस्त्यावर पडलेला कचरा उचल करण्यास महानगरपालिका दुर्लक्ष करत होती. मनपाने सदर कचऱ्याची उचल करण्याबद्दल कळवूनसुद्धा दुर्लक्ष होत होते. याबाबत ग्राम पंचायत सदस्य राकेश पाटील यांनी कचरा उचल करून परिसरात स्वच्छता केली. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.









