दिघंची :
आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथील तलावामधून पाणी सोडण्यासाठी मागणी करूनही कृत्रिम अडथळे आणून पाणी अडवण्याच्या उद्योगाविरोधात शेतकऱ्यांचा गुरूवारी उद्रेक झाला. राजेवाडीच्या पाण्यासाठी दिघंची येथील हायवेवरील मुख्य चौकात सांगोला व आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी रास्तारोको करून संताप व्यक्त केला. दरम्यान, आंदोलनानंतर मागील काही दिवसांपासून आडकाठी आणलेले पाणी राजेवाडी तलावातून सोडण्यात आले.
सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यासाठी लाभदायक ठरणाऱ्या राजेवाडी तलावातुन पाणी सोडण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू आहे. परंतु सातारा जिल्ह्यातून राजकीय अडथळे आणून हे पाणी अडविल्याच्या चर्चा होत्या. चालू वर्षी पाण्याचे पाच आवर्तन मंजूर असताना फक्त एकच आवर्तन यापूर्वी सुटले आहे. सध्या पिके पाण्याअभावी वाळत असून आटपाडीसह सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी राजेवाडी तलावातून पाणी सोडण्यासाठी सातत्याने आग्रह केला. परंतु अधिकाऱ्यांकडुन टोलवाटोलवी करून विलंब केला जात होता.
पाण्यासाठी मागणी करूनही कानाडोळा होत असल्याने संतप्त आटपाडी व सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाणी संघर्ष समितीच्यावतीने आंदोलनाची हाक दिली. गुरूवारी सकाळी दिघंची बसस्थानक चौकात मुख्य हायवेवर ठिय्या मांडुन रास्ता रोको करण्यात आला. पुजारवाडी (दि), दिघंची, उंबरगाव, शेरेवाडी, कटफळ, खवासपुर, आचकदाणी, लक्ष्मीनगर, चिकमहुद, नरळेवाडी, वाकी, शिवणे यासह परिसरातील अन्य गावामधील शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
विजयसिंह खरात, विजय लवटे, बाळासाहेब मोरे, प्रणव गुरव, भैय्या मोरे, स्वप्नील पुजारी, विजय पवार, ब्रह्मदेव होनमाने, विजय मोरे, राजकुमार पडळे, उन्मेष देशमुख, दिगंबर मोरे, नामदेव ढोले, संतोष दुधाळ, अविनाश रणदिवे, आबासाहेब सावंत, अजय शेटे यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी राजेवाडीच्या पाण्याचा आग्रह करत अडवणुकीबाबत संताप व्यक्त केला.
दिघंचीतील रस्तारोकोमुळे तीन मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दरम्यान, पोलीस प्रशासन, महसुल प्रशासनाने आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर राजेवाडी तलावातुन पाणी सोडण्यात आले. मागील काही दिवसांपासुन राजेवाडीचा पाणीप्रश्न प्रतिष्ठेचा बनला असुन पाणी सोडण्यात अडथळे आणले जात आहेत. त्यातुन आटपाडी व सांगोला तालुक्यावर अन्याय होत आहे. याप्रश्नी खानापूर मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर, सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी यापुर्वीच आक्रमक भुमिका मांडली होती.
तसेच सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांच्यासह अन्य मंडळींनीही राजेवाडी तलावातून तात्काळ पाणी सोडण्याची मागणी केली होती. हक्काच्या पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांतून संतप्त भावना व्यक्त होत असून येणाऱ्या कालावधीत राजेवाडीचे पाणी वेळेत न सोडल्यास तीव्र लढा उभारण्याचा इशारा आटपाडी व सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.








