शिवस्वराज्य संघटनेतर्फे सार्व. बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन
खानापूर : लालवाडी ते चापगाव व चापगाव ते अवरोळीपर्यंतच्या रस्त्याची दयनिय अवस्था झाली आाहे. हा रस्ता लालवाडीपासून अवरोळीपर्यंत अनेक खेड्यांचा संपर्क रस्ता आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे साफ दुर्लक्ष झाले आहे. तसेच लोकप्रतिनिधीनीही याबाबत गांभीर्याने घेतलेले नाही. यासाठी शिवस्वराज्य संघटनेच्यावतीने या रस्त्याचे काम हाती घ्यावे, अन्यथा रस्तारोको करण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी देण्यात आला आहे. यावेळी शिवस्वराज संघटनेचे खजिनदार मुकुंद पाटील, अभिजीत सरदेसाई, सुनील पाटील, मिलिंद देसाई, संदेश कोडचवाडकर, म्हात्रु धबाले आदी उपस्थित होते.
लालवाडी क्रॉस ते अवरोळीपर्यंत रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासून दुरुस्ती अथवा डागडुजी करण्यात आलेली नाही. गेल्या काहीवर्षापासून हा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून या रस्त्याचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन वाहतूक करताना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावरुन अनेक गावांचा संपर्क रस्ता आहे. रस्त्याची चाळण झाली आहे. मात्र या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने गेल्या अनेकवर्षापासून साफ दुर्लक्ष केले आहे.
वेळोवेळी अर्जविनंत्या करुनदेखील या रस्त्याची डागडुजी अथवा दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या भागात ऊस लागवड मोठ्या प्रमाणात होते. येत्या काही दिवसात ऊस तोड सुरू होणार असल्याने या रस्त्यावरुन ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात होणार आहे. मात्र रस्ताच धोकादायक बनल्याने ऊस वाहतूक करताना अपघाताच शक्यता आहे. यासाठी येत्या आठ दिवसात रस्त्याची डागडुजी करून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात यावा, अन्यथा रास्तारोकोचा इशारा शिवस्वराज्य संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.









