बसची इंधनाने भरलेल्या व्हॅनला धडक : 15 जण जखमी
वृत्तसंस्था/ लाहोर
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात रविवारी सकाळी एका बसला आग लागली असून या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 15 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला अन् मुलांचा देखील समावेश आहे. लाहोरपासुन सुमारे 140 किलोमीटर अंतरावर फैसलाबाद मोटरवेच्या पिंडी भट्टियां शहरात ही दुर्घटना पहाटे 4.30 वाजता घडली आहे.
या रस्त्यावर एक बस एका पिकअप व्हॅनला धडकली आहे. बसमधून सुमारे 40 जण कराचीहून इस्लामाबादच्या दिशेने प्रवास करत होते. दोन्ही वाहनांच्या चालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पिंडी भट्टियां येथे बसने एका व्हॅनला मागून धडक दिली होती. तर व्हॅनमधून इंधनाची वाहतूक केली जात होती. यामुळे बसच्या धडकेनंतर मोठा स्फोट होत आग लागली होती. दुर्घटनेतील काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे पोलीस महानिरीक्षक सुल्तान ख्वाजा यांनी सांगितले आहे.
होरपळलेल्या प्रवाशांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमधून उडी मारण्यास यशस्वी ठरलेले प्रवासी वाचले आहेत. दुर्घटनेवेळी बसचालकाला झोप अनावर झाली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
व्हॅनमध्ये इंधन टँक नसते तर दोन्ही वाहनांना आग लागली नसती. जीव गमाविणाऱ्यांची ओळख डीएनए चाचणीद्वारे करावी लागणार आहे. त्यानंतरच मृतदेह संबंधितांच्या कुटुंबीयांना सोपविण्यात येणार आहेत असे ख्वाजा यांनी सांगितले आहे. पंजाब प्रांताचे काळजीवाहू मुख्यमंत्री मोहसिन नकवी यांनी दुर्घटनेतील मृतांबद्दल शोक व्यक्त केला. तसेच जखमींवर चांगले उपचार करविण्याचा आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.









