बेळगाव : शहरात पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याने विशेषत: महिलावर्गाची वणवण सुरू आहे. असे असताना पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आरओ प्लांट अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे हे प्लांट केवळ शोभेसाठी उभारले आहेत का? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.
शहरात ठिकठिकाणी स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा या हेतूने लाखो रुपये खर्च करून आरओ प्लांट बसविले आहेत. यामुळे नागरिकांना अवघ्या पाच रुपयांमध्ये स्वच्छ पाणी उपलब्ध होत असल्याने आरओ प्लांटला मोठ्या प्रमाणात मागणी होती. विकत आणणाऱ्या पाण्यापेक्षा आरओ प्लांटचे पाणी परवडणारे असल्याने व्यापारी आणि विक्रेत्यांची मागणी होती.
शहरातील अनेक आरओ प्लांट सध्या बंद अवस्थेत आहेत. धर्मवीर संभाजी चौक येथील आरओ प्लांट काही महिन्यांपासून बंद आहे. तसेच शिवाजी उद्यान शहापूर येथील आरओ प्लांट वापराविना पडून आहे. किरकोळ दुरुस्ती असेल तर ती लवकर पूर्ण करावी, अशी मागणी होत आहे. सध्या उन्हाळ्यात स्वच्छ पाणी मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण प्रकल्पातून प्रक्रिया झालेले पाणी मिळविण्यासाठीची धडपड सुरू आहे. आरओ प्लांट लवकर सुरू करण्याची मागणी होत आहे.









