मनपा अधिकाऱ्यांचा गलथान कारभार बैठकीत चव्हाट्यावर
बेळगाव : शहरातील विविध भागाला पिण्याच्या पाण्यासाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जलशुद्धीकरण केंद्र (आरओ प्लान्ट) ची उभारणी करण्यात आली आहे. एकूण 12 आरओ प्लान्ट शहरामध्ये उभारले असून त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी राखीव ठेवण्याबाबत बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र हे आरओ प्लान्ट सुरू आहेत का? याची विचारणा केली असता अधिकाऱ्यांकडे कोणतेच उत्तर नव्हते. त्यामुळे पुढील बैठकीत यावर चर्चा करण्याचे ठरविण्यात आले. बुधवारी महापालिकेतील बांधकाम स्थायी समितीची बैठक अध्यक्ष वाणी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आरओ प्लान्टच्या दुरुस्तीसाठी राखीव निधी ठेवणे गरजेचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवकांनी प्रथम आरओ प्लान्ट सुरू आहेत का? याची विचारणा केली. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आरओ प्लान्टची उभारणी केली आहे. ते आरओ प्लान्ट आता महापालिकेकडे हस्तांतर करण्यात आल्याचे अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी सांगितले. स्मार्ट सिटीकडून हस्तांतर करताना ते आरओ प्लान्ट सुरू आहेत का? असे विचारले असता दोन आरओ प्लान्ट सुरू असल्याचे उत्तर त्यांच्याकडून आले. त्यामुळे नगरसेवकांनी जर आरओ प्लान्ट सुरूच नसतील तर दुरुस्तीसाठी निधी कशाला राखीव ठेवायचा? असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे यावर पुढील बैठकीत चर्चा करून ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला महापौर शोभा सोमणाचे, उपमहापौर रेश्मा पाटील यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते.









