वृत्तसंस्था / गुवाहाटी
2025 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात राजस्थान रॉयल्सला षटकांची गती राखता आली नाही. त्यामुळे या संघाचा हंगामी कर्णधार रियान परागला आयपीएलच्या नियमानुसार 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा 6 धावांनी पराभव करत स्पर्धेतील आपल्या विजयाचे खाते उघडले. दरम्यान चेन्नई सुपर किंग्जला सलग दोन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाला सलामीच्या सामन्यात सन रायझर्स हैद्राबाद संघाकडून हार पत्करावी लागली होती. आता राजस्थान रॉयल्सचा या स्पर्धेतील पुढील सामना किंग्ज इलेव्हन पंजाबबरोबर 5 एप्रिल रोजी मुलानपूर येथे होणार आहे.









