दुलीप ट्रॉफी स्पर्धेत इंडिया सी संघाचा इंडिया डी वर दणदणीत विजय : सामनावीर मानव सुथारचे 8 बळी
वृत्तसंस्था/ अनंतपूर (आंध्र प्रदेश)
आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे खेळवल्या गेलेल्या दुलीप ट्रॉफीतील सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील इंडिया सी संघाने इंडिया डी संघावर 4 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह इंडिया सी संघाला 6 गुण मिळाले आहेत. सामन्यात आठ बळी मिळवणाऱ्या युवा मानव सुथारला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
प्रारंभी, नाणेफेकीचा कौल जिंकून कर्णधार ऋतुराज गायकवाडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच श्रेयस अय्यरच्या ड संघाच्या वाटेला फलंदाजी आली. पहिल्या डावात ड संघाकडून अक्षर पटेल वगळता सर्वच फलंदाज फेल ठरले. त्याने एकट्याने 86 धावांची खेळी केली, इतर फलंदाज फ्लॉप ठरले. यामुळे पहिल्या डावात इंडिय डी संघाला 164 धावांपर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तरात इंडिया सी संघाने 168 धावा केल्या आणि 4 धावांची आघाडी घेतली. इंद्रजीथने सर्वाधिक 72 धावांची खेळी केली. अभिषेक पोरेलने 34 धावांचे योगदान दिले.
तिसऱ्याच दिवशी सामन्याचा निकाल
अपेक्षेप्रमाणे वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले, मात्र तिसऱ्या आणि चौथ्या डावात फिरकीपटूंनीही आपली ताकद दाखवून दिली. इंडिया सीचा फिरकीपटू मानव सुथार (7/49) अव्वल ठरला. त्याने इंडिया डीच्या दुसऱ्या डावात 7 बळी घेतले आणि संपूर्ण संघाला केवळ 236 धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पहिल्या डावात अपयशी ठरलेल्या इंडिया डी संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने (54) दुसऱ्या डावात झटपट अर्धशतक झळकावले पण त्याला मोठी खेळी खेळता आली नाही. पडिक्कलने 56 तर रिकी भुईने 44 धावांचे योगदान दिले. मानव सुथारच्या भेदक माऱ्यासमोर इंडिया डी चे फलंदाज सपशेल अपयशी ठरले व त्यांचा डाव 58.1 षटकांत 236 धावांवर आटोपला. इंडिया सी संघाला 233 धावांचे टार्गेट मिळाले.
पहिल्या डावात इंडिया सी कडे 4 धावांची आघाडी होती, यामुळे शेवटच्या डावात त्यांना केवळ 233 धावांचे लक्ष्य होते. हे लक्ष्य तिसऱ्या आणि चौथ्या दिवशीही कठीण ठरू शकले असते, पण कर्णधार ऋतुराजने (46) आक्रमक फलंदाजी करत संघाला वेगवान सुरुवात करून दिली. ऋतुराज आणि साई सुदर्शन (22) या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 11 षटकांत 64 धावा केल्या होत्या. फटकेबाजीच्या प्रयत्नात हे दोघे बाद झाल्यानंतर रजत पाटीदार (44) आणि आर्यन जुयाल (47) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी साकारली. यानंतर अभिषेक पोरेलने मानव सुथारसह संघाला विजय मिळवून दिला. पोरेलने नाबाद 35 तर सुथारने नाबाद 19 धावा केल्या. इंडिया सी संघाने 61 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यातच विजयी लक्ष्य पूर्ण केले.









