हिंदू कालगणनेनुसार आमचे ऋतू वैभव सहा प्रकारात विभागलेले दिसते. वर्षाचे दोन-दोन महिने या प्रत्येक ऋतूंसाठी राखून ठेवलेले असतात. एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूत आपण केव्हा कसे गेलो याचा पत्ताच आपल्याला लागत नाही. कारण आता सुरू असलेला ऋतू पुढे बराच काळ रेंगाळतो आणि येणाऱ्या ऋतूला केव्हा पायघड्या घालतो हे लक्षातच येत नाही. अशा या ऋतूंचं सुंदर वर्णन कालिदासासारख्या एखाद्या सिद्धहस्त कवीने करावं, अन् ऋतुसंहार सारखं अक्षरशिल्प निर्माण व्हावं हे आपलं भाग्यच. खरंतर संहार हा शब्द म्हणजे नाश करणारा, परंतु संस्कृत शब्दांनुसार संहार म्हणजे समुच्चय, सहा ऋतूंचा समुच्चय असलेल्या या ग्रंथात वसंताचं वैभव सहाव्या सर्गामध्ये अगदी शिगेला पोहचलेले दिसते. त्याही पूर्वी या वसंताचे वर्णन ज्ञानदेवांनी फार सुंदर शब्दात करून ठेवले आहे. ‘वसंताचा आगमू , की वसंती आघवी आरामू, आरामीही प्रिय संगमु, संगमी आगमनु, उपचारांचा…’ याचा अर्थ… वसंत म्हणजे आराम, वसंत म्हणजे सुरूदांची भेट, विविध खाद्यपदार्थांची चंगळ, मौजमजेचं आगमन आणि छेडछाडीची धांदल, ज्ञानदेवांनी वर्णन केलेला वसंत ऋतू निरनिराळ्या राज्यांमध्ये रंगपंचमी, होळी या सणांना खूप नटून थटून समोर येतो. वेगवेगळ्या रंगात न्हाहून येतो. माणसाचं रोजचं जीवन खरं म्हणजे धकाधकीचं, काळजीचं, उद्या काय होईल याची शाश्वती नसणारं. पण एकमेव हा ऋतू या सगळ्या जाणिवा हळुवारपणे देत माणसाला जगण्यासाठी आश्वस्त करतो. म्हणून या ऋतूत संपूर्ण आरामच आराम वाटतं. जाणाऱ्याची हळहळ नाही आणि येणारे नक्की येणार, याची खात्री देणारा ऋतू माणसाच्या मनात चैतन्याची पालवी पालवतो. आशादायी चित्र उभं करतो. आप्तेष्टांना, मित्रांना, उत्सवाच्या माध्यमातून भेटवतो. अनेक व्यक्तींच्या, प्रियजनांच्या विरहाचा काळ या ऋतूत संपतो. अनेक पदार्थांची रेलचेल असणारे सण उत्सव मनपसंत खाण्याने अगदी बहरून येतात. वसंत ऋतूत रसयुक्त फळांचा बहर असतो. उन्हं जशी पानगळतीला कारणीभूत ठरतात तशी फळांना जास्तीत जास्त मधुर आणि रसयुक्त बनवत जातात. स्ट्रॉबेरी संपत आली की तिला जास्त छान चव येते, कारण उन्हाची तलखी वाढलेली असते. ती जास्त परिपक्व होते. उसाचा रस याच काळात माणसाची तहान भागवतो. आंबा देखील याच ऋतुची भेट. कसदार अन्नधान्य याच काळात पूर्णत्वाला येतं. याच कालखंडात फुलणारे ‘सेमल’ नावाचे फूल लाल, नारंगी आणि पिवळ्या रंगात पक्षांसाठी आपल्या छोट्या छोट्या पेल्यांमध्ये सुंदर द्रव्य निर्माण करून ठेवतात. पक्षांची तहान भागवतात. अशा फुलांच्या सावलीत हे पक्षी विसावतात देखील. अती तापमानाला तोंड देणारं आणखीन एक फुल बर्फाळ आणि थंड प्रदेशात पाहायला मिळतं ते म्हणजे ‘ट्युलिप’. डोळ्यांचं पारणं फीटेल अशा रंगछटा या फुलाला मिळालेल्या दिसतात. पण या वसंताची येण्याची वार्ता डॅफोडीलचे फुल देते जे फारसे कोणाच्या नजरेला पडत नाही. पण वसंताची वाट बघत आपलं अस्तित्व टिकून राहतं. ब्ल्यू बेल किंवा निलमोहर म्हणजेच वसंताचे नांदी म्हणणारे सूत्रधारच वाटतात. कारण या वसंताच्या नाट्याचा पडदा उघडल्यावर भडक रंग पुढे आल्याने ते निळसर रंग अगदी फिकट ठरतात. पण स्वत:चं असं एक वेगळे स्थान निर्माण करून जातात. रसयुक्त, गंधयुक्त ऋतू चंदनाच्या उटीने सजण्यासाठी वसंत पंचमीचा सोहळा सर्वत्र दिमाखात सुरू होतो. प्रत्यक्ष असणाऱ्यांसाठीची कृतज्ञता या ऋतुतून व्यक्त होते. कारण वसंत ऋतूतून साऱ्या पृथ्वीचा स्वर्ग होणार आणि स्वर्गात फक्त देवांचेच वास्तव्य असणार, अशा देवरूप संतांना भक्तीरूपी सुगंध चंदनाची ऊटी लावण्याचा दिवस वसंत पंचमीच्या निमित्ताने येतो. पानगळती नंतरही बहरणारा ऋतू आणि बहरणारी आणि मोहरणारी झाडं फुलं, फळं माणसाला निराश व्हायला वेळच ठेवत नाहीत. अनुपम सौंदर्याच्या पाचोळ्यांचे पैंजण बांधून येणारा हा वसंत ऋतू माणसाला विषम परिस्थितीशी सांगड घालायला शिकवतो. निसर्ग माणसासारखाच त्याला संयम नसतोच मुळी. कोणतीही वेळ झाली की बहरत राहायचं एवढंच त्याला माहिती असतं. कोणाची थकबाकी मोजायची नाही किंवा येणाऱ्यावर सावकारी व्याजही चढवायचं नाही. फक्त वेळच्यावेळी जायचं आणि यायचं असा निष्काम कर्मयोगी निसर्ग या ऋतूत आपल्याला बघायला मिळतो. हा बहरतो आणि अलिप्तपणे नकळत पाय न वाजवता सहज निघूनही जातो. आम्ही मात्र या संसाराच्या मोहमायेत अडकून पडलेलो दिसतो.
Previous Articleनेदरलँड्समध्ये तिरंगी टी-20 मालिका मे महिन्यात
Next Article पंकज अडवाणी, कॉजियर उपउपांत्यपूर्व फेरीत
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








